बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा ‘श्रीगणेशा’

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑगस्ट 2017

धरमपेठ अतिक्रमणमुक्त करण्याचा ध्यास - पोलिस, मनपाचे हातात हात
नागपूर - धरमपेठ परिसरात दोन दिवस जनजागृतीवर भर देणाऱ्या पोलिस प्रशासनाने शनिवारपासून बेशिस्त वाहनचालक आणि अतिक्रमणधारकांवर कारवाईचा ‘श्रीगणेशा’ केला. मनपा आणि पोलिस प्रशासनाने हातात हात घेत हे कारवाईसत्र आरंभिले. धास्तावलेल्या वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे कसोशीने पालन झाल्याने धरमपेठेतील वाहतूक अगदीच ‘स्मूथ’ जाणवली.

धरमपेठ अतिक्रमणमुक्त करण्याचा ध्यास - पोलिस, मनपाचे हातात हात
नागपूर - धरमपेठ परिसरात दोन दिवस जनजागृतीवर भर देणाऱ्या पोलिस प्रशासनाने शनिवारपासून बेशिस्त वाहनचालक आणि अतिक्रमणधारकांवर कारवाईचा ‘श्रीगणेशा’ केला. मनपा आणि पोलिस प्रशासनाने हातात हात घेत हे कारवाईसत्र आरंभिले. धास्तावलेल्या वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे कसोशीने पालन झाल्याने धरमपेठेतील वाहतूक अगदीच ‘स्मूथ’ जाणवली.

धंतोलीच्या धर्तीवरच शहरातील व्यस्ततम परिसर असलेल्या धरमपेठेतील वाहतुकीला शिस्त लावण्याचे शिवधनुष्य पेलण्याचा निर्धार पोलिस दलाने केला आहे. वाहतुकीची शिस्त लावण्यासाठी प्रारंभी दोन दिवस पोलिसांनी विविध घटकांशी संवाद साधून विश्‍वास संपादित केला. शनिवारी अचानक कारवाईचा बडगा उगारला. पोलिस निरीक्षक जयेश भांडारकर यांच्या नेतृत्वात सकाळपासून कारवाईला प्रारंभ केला.

मनपाचे अतिक्रमणविरोधी पथकही सकाळपासून गोकुळ मार्केट परिसरात दाखल झाले. प्रारंभी फुटपाथवरील अतिक्रमणधारकांना हुसकावून लावले. लॉ कॉलेज चौक ते शंकरनगर आणि लक्ष्मीभुवन चौक ते रामनगर दरम्यान एकूण ५५ अतिक्रमणधारकांवर कारवाई केली. गणेशमूर्ती विक्रेत्यांनी फुटपाथपर्यंत दुकाने थाटलेली दिसून आली. काही दिवसच हा व्यवसाय असल्याने फुटपाथच्या आतच लावण्याची समज दिली.परवानगी नसलेल्या ठिकाणी पार्किंग करणाऱ्यांवर कारवाई केली. अस्ताव्यस्त पार्क असलेल्या ४७ दुचाकी उचलून नेल्या. २७ चारचाकींना जामर लावून दंडात्मक कारवाई केली. वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या ९ चारचाकी वाहनांना क्रेनच्या मदतीने उचलून नेले, तर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल ३७१ जणांना ई-चालान पाठविले. कारवाईचा धडाका सुरूच राहणार असल्याने वाहनचालकांनी कसलीही हयगय न करता नियमांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन पोलिस दलातर्फे करण्यात आले आहे. 

फलकांमुळे वाहनचाकांमध्ये संभ्रम
धरमपेठ परिसराची नो पार्किंग झोन, वन वे, वन साइड पार्किंग अशा टप्प्यांत विभागणी केली. चारचाकी, दुचाकींसाठी पार्किंगची जागा निश्‍चित करून त्यासंदर्भात ठिकठिकाणी फलकही लावले आहे. काही फलकांवर इंग्रजीत पण कळेल अशी सूचना आहे. परंतु, बऱ्याच फलकांवर नो पार्किंग आणि खाली ओनली फॉर फोर व्हीलर किंवा टू व्हीलर असे अंकित केले आहे. यामुळे इथे गाडी लावायची की लावू नये, याबाबत संभ्रम आहे. वाहनचालकांना कळेल अशा भाषेत फलक लावावेत, अशी मागणी परिसरातील रहिवासी शंकर पांडे यांनी केली.

वाहतूक पोलिसांनी वेस्ट हायकोर्ट रोडवरचे फुटपाथसुद्धा मोकळे करावे. वाहनांच्या वर्दळीमुळे या मार्गावरून पायी चालणेही अवघड आहे. सातत्याने वाहने भरधाव धावतात. यामुळे पायी चालणाऱ्या, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना जीव मुठीत घेऊनच चालावे लागते. पायी चालणाऱ्यांसाठी फुटपाथ आहेत. मात्र, बहुतांश दुकानदारांनी ते गिळंकृत केले आहेत, तर काही जागेवर फेरीवाल्यांनी दुकाने थाटले आहे. नुसत्या चारचाकी वाहनांवर बंदी घालून या मार्गावर समस्या सुटणार नाही, तर फुटपाथही मोकळे करावे लागेल.
- प्रशांत पवार, अध्यक्ष, जय जवान जय किसान संघटना.

Web Title: nagpur vidarbha news Action on unskilled driving