यजमानपदाच्या शर्यतीतून अमरावती, शिरूर बाहेर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 जून 2017

संमेलनस्थळ निवड समितीची 19 जूनला दिल्लीवारी

संमेलनस्थळ निवड समितीची 19 जूनला दिल्लीवारी
नागपूर - अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या संमेलन स्थळ निवड समितीने दिल्ली, बडोदा आणि बुलडाण्याला भेटी देण्याचा निर्णय घेतल्याने अमरावती, शिरूर (पुणे) आणि चंद्रपूर (तळोधी) यजमानपदाच्या शर्यतीतून बाद झाले आहेत. आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीला होणार, अशी शक्‍यता वर्तविली जात आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात मोर्चेबांधणी सुरू आहे. परंतु, महामंडळाकडे आलेल्या प्रस्तावांना प्रतिसाद दिल्याशिवाय अशी कुठलीही घोषणा शक्‍य नाही.

अमरावती व शिरूर (पुणे) येथून प्रस्ताव दाखल करणाऱ्या शरद क्रीडा मंडळावर एक पाऊल मागे घेण्याची वेळ आली आहे. तळोधी (चंद्रपूर) येथून दरवर्षी दाखल होणाऱ्या प्रस्तावाला यंदाही नाकारण्यात आले आहे. त्यामुळे विदर्भातील केवळ मेहकर तालुक्‍यातील हिवरा आश्रम (बुलडाणा) हे एकमेव स्थळ या स्पर्धेत कायम आहे. महाराष्ट्राबाहेरील दिल्ली व बडोद्यापैकी एका स्थळाला पसंती मिळते की महाराष्ट्रातील बुलडाण्याला पसंती मिळते, हे स्थळ निवड समितीचा दौरा आटोपल्यावरच स्पष्ट होऊ शकेल.

निवड समिती 19 जूनला दिल्ली, 20 जूनला बडोदा आणि त्यानंतर बुलडाण्याला भेट देणार आहे. सर्व ठिकाणांना भेटी दिल्यानंतर समितीचे सातपैकी चार सदस्य ज्या स्थळाच्या बाजूने मतदान करतील, त्याठिकाणी संमेलन होईल, असा नियम आहे. या मतदानातून येणारा कल अंतिम असल्यामुळे कोण कुठल्या स्थळाच्या बाजूने पसंती दर्शवतो, यावर सर्व अवलंबून असेल.

Web Title: nagpur vidarbha news akhil bhartiy marathi sahitya samelan place