अमितने तडफडतच सोडला प्राण

अमितने तडफडतच सोडला प्राण

मानापूर शोकाकुल; पाण्यातील वीजप्रवाहाने घेतला जीव
रामटेक - अत्यंत आनंदात तो दिवसभर बागडत होता. सकाळी लग्नात मनसोक्त नाचला. काकांसोबत भंडारबोडीच्या बाजारात गेला. गावाकडे परत येत असताना राजीव गांधी सभागृहातील नृत्य पाहण्याची त्याला इच्छा झाली. मात्र त्या इच्छेच्या रूपाने काळानेच त्याच्यावर झडप घातली. पाण्यातील वीजप्रवाहाने तडफडून त्याचा मृत्यू झाला. अमित सुरेश आकरे (वय १२, मानापूर) असे त्याचे नाव आहे. 

रामटेक शहरालगत तीन किलोमीटर अंतरावर मानापूर हे छोटेसे गाव आहे. गावात सुरेश आकरे यांचे चार जणांचे सुखी कुटुंब राहते. मोठी मुलगी आचल ऊर्फ प्रियांका ही नुकतीच दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाली. तर त्यांचा लहान मुलगा अमित हा श्रीराम विद्यालयात सातवी उत्तीर्ण होऊन आठवीत गेला होता. मोलमजुरी करून राहणारे कुटुंब समाधानात राहत होते. मंगळवारी (ता. २०) अमित गावातील एका वरातीत मनसोक्त नाचला. नंतर काका प्रशांत भाऊराव आकरे (वय ३९) यांच्यासोबत त्यांच्या गाडीतून भंडारबोडी गावातील आठवडी बाजारात गेला. सायंकाळी ते घरी येत असताना नगर परिषदेच्या राजीव गांधी सभागृहात ए. पी. रॉकर्स या डान्स अकादमीद्वारे आयोजित नृत्याच्या कार्यक्रमासाठी ते थांबले. साधारण दहाच्या सुमारास अमित आणि त्याचे काका सभागृहाबाहेर आले. सभागृहाच्या प्रवेशद्वारासमोर लोखंडी खांबाला पाल बांधून आडोसा केला होता. नुकताच पाऊस येऊन गेला होता.

प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस पाणी साचले होते. बाहेर आल्यानंतर तो पुन्हा आत जाण्यासाठी प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूचे पाल उचलून आत जाऊ  लागला. पाण्यात पाय पडताच त्याला विजेचा जोरदार झटका बसला आणि तो पाण्यात पडून तडफडू लागला. ते पाहून त्याचे काका धावले व त्यांनी त्यास पकडण्याचा प्रयत्न केला तर विजेच्या धक्‍क्‍याने ते दूर फेकल्या गेले. सुदैवाने ते पाण्यात पडले नाहीत. तेवढ्यातच अमितची आत्या नीलिमा यादवराव घाटे यांनीही अमितला उचलण्याचा प्रयत्न केला.

त्यांनाही विजेचा धक्का लागून त्या दूर फेकल्या गेल्या. तोवर प्रवेशद्वाराजवळ बसलेल्या पोलिसांना हा प्रकार दिसला. त्याचवेळी वीजपुरवठा खंडित झाला. लगेच त्या सर्वांना अगोदर हांडे हॉस्पिटल तेथून योगीराज हॉस्पिटल आणि नंतर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अमितला तपासून मृत घोषित केले. तर इतर दोघांवर उपचार केले. मात्र एवढी घटना घडूनही कार्यक्रमात दोन नृत्ये झालीत.

सभागृहासमोरील पाण्यात वीजप्रवाह कसा आला, या प्रश्नाचे उत्तर पोलिस शोधतीलच तसेच दोषींवर कारवाईदेखील होईल, मात्र लहानग्या अमितचे आईवडील आता त्याला कधीच पाहू शकणार नाहीत. मुलगा गेल्याचे ऐकून त्या घरात धक्‍काच बसला. त्याचे वडील, आई आणि बहीण सर्वच निःशब्द झाले. आई-वडील दोघेही शून्यात नजर लावून बसले आहेत. त्यांचे सांत्वन कोण करणार? सर्व गावच शोकसागरात बुडाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com