चौकाचौकांत ऑटोचालकांचे साम्राज्य

चौकाचौकांत ऑटोचालकांचे साम्राज्य

पोलिसांचा वचक संपला - वाहतुकीची ऐशीतैशी

नागपूर - शहरातील वाहतूक व्यवस्था व्यवस्थित करण्यासाठी थेट पोलिस आयुक्‍त  प्रयत्न करीत आहेत. दुसरीकडे वाहतूक पोलिसांच्या अर्थपूर्ण धोरणामुळे ऑटोचालक चौक आपल्याच बापाचेच अशा पद्धतीने पोलिसांच्या नाकावर टिच्चून भरचौकात ऑटो उभे करतात. त्यांना कोणीही टोकत नाहीत आणि हटकण्याचा प्रयत्न केल्यास नागरिकांच्याच अंगावर धावून जातात. सीताबर्डी, व्हेरायटी चौकात हे दृश्‍य सर्रासपणे बघायला मिळते. धंतोली आणि धरमपेठमध्ये शिस्त लावणाऱ्या आयुक्तांनी आता चौकांकडेही लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.

शहरातील फुटपाथवर आजही दुकानदार, ठेलेचालक, विक्रेते यांचा ताबा आहे. सीताबर्डी,  धंतोली, सदर, लकडगंज, इंदोरा, पाचपावली, धरमपेठ, काटोल रोड आणि सेंट्रल एव्हेन्यूवर तर फुटपाथच दिसत नाहीत. पोलिस आयुक्‍तांनी नियमानुसार ऑटोचालकांना वाहतूक करण्याचे आवाहन केले होते. मात्र, वाहतूक पोलिसच त्यांच्या आदेशाचे पालन करीत नसतील तर ऑटोचालकांकडून कशी अपेक्षा करणार? त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करायची असेल तर वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांना ‘नीट’ करायला हवे. सीताबर्डीतील वाहतूक व्यवस्था पाहता चक्‍क पोलिस आयुक्‍तांना रस्त्यावर उतरून हाती शिटी घेऊन वाहतूक नियंत्रित करावी लागल्याचे ताजे उदाहरण आहे. 

व्हेरायटी चौक
व्हेरायटी चौकात केवळ पोलिस आयुक्‍त आल्यावरच वाहतूक सुरळीत असते. त्यानंतर मात्र, ‘जैसे थे’ स्थिती निर्माण होते. वाहतूक पोलिस कर्मचारी चिरीमिरी घेत असल्यामुळे ऑटोचालक थेट वर्दीवरच हात उगारण्याचे प्रकार घडले आहेत. प्रवाशांनाही ऑटाचालकांचा त्रास आहे. मात्र, वाहतूक पोलिसांशी हातमिळवणी असल्यामुळे तक्रार कुठे करावी? असा प्रश्‍न पडतो. 

एमआयडीसी चौक
एमआयडीसी चौकातून वाडीकडे जवळपास ५०० पेक्षा जास्त ऑटो फेऱ्या मारतात. यामध्ये शहरात बंदी असलेल्या सिक्‍स सिटर आणि व्हाइट मॅजिकचा समावेश आहे. शहरात बंदी असल्यानंतरही केवळ वाहतूक पोलिसांच्या भ्रष्ट धोरणामुळे शहरात व्हाईट मॅजिक बिनधास्त सवारी नेत आहेत. ग्रामीण विभागात व्हाइट मॅजिक सर्वाधिक धावत असून त्यासाठी वाहतूक पोलिसांशी साटेलोटे करण्यात आल्याची माहिती आहे.

इंदोरा चौक
कामठी रोडवर अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. येथील थेट पोलिस निरीक्षकच रस्त्यावरील अवैध वाहतुकीचे देणेघेणे नसल्याची भूमिका घेत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात होणारी अवैध वाहतूक ही पोलिसांच्याच आशीर्वादाने सुरू आहे. या भागात ऑटोचालक थेट प्रवाशांसोबत वाद घालून बळजबरीने पैसे उकळतात. अस्ताव्यस्त वाहतूक असल्यानंतही पोलिस निरीक्षकांचे ‘तोंडावर बोट’ अशी भूमिका असल्यामुळे आश्‍चर्य वाटत आहे.

सेंट्रल एव्हेन्यू
या मार्गावर अवैध प्रवासी वाहतूक नेहमीचीच आहे. नव्याने आलेल्या पोलिस निरीक्षकांच्या दुर्लक्षित धोरणामुळे सेंट्रल एव्हेन्यूवर नेहमीच वाहतुकीची कोंडी निर्माण झालेली असते. सुसाट दुचाकीस्वारांचा आवडता रस्ता म्हणून सीए रोड प्रसिद्ध आहे. या परिसरातील फुटपाथ मेकॅनिक दुचाकी विकणाऱ्यांच्या ताब्यात आहे. मात्र, त्यांच्यावर आतापर्यंत एकदाही कारवाई झाली नाही. तसेच पोलिस आयुक्‍तांचाही या परिसरात दौरा नसल्यामुळे वाहतूक व्यवस्थेकडे कुणाचेही लक्ष नसते.

वर्धा रोड
वर्धा रोडवर अवैध प्रवासी वाहतुकीसह फुटपाथवर चहाचे ठेले, हातठेले चालकांची गर्दी असते. त्यामुळे पादचाऱ्यांना त्रास होतो. दुकानदारांनीही फुटपाथवर कब्जा मिळवला असून तेसुद्धा वाहतूक पोलिसांशी हातमिळवणी करून वरचढ झाले आहेत. शहरातील वाहतुकीचे तीनतेरा वाजविण्यासाठी हातठेले, रस्त्यावरील विक्रेते यांच्याह वाहतूक पोलिसही तितकेच जबाबदार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com