दोनशेवर बार, हॉटेल्स धोकादायक

Wine
Wine

नागपूर  - मागील महिन्यात धरमपेठेतील ‘रुफ नाईन’वर कारवाईनंतर महापालिकेच्या अग्निशमन विभागाने शहरातील इतर बार, रेस्टॉरेंटवर कारवाईसाठी पावले उचलली आहे. शहरात २०३ बार, रेस्टॉरेंटमध्ये अग्निशमन सुरक्षा यंत्रणा नसून यातील २२ रेस्टॉरेंट व बार जीर्ण इमारतीत असून त्या पडण्याची शक्‍यता व्यक्त करीत अग्निशमन विभागाने नोटीस बजावली आहे. 

डिसेंबरमध्ये कमला मिल कंपाउंडमधील वन अबोव्ह व मोजोस बिस्ट्रो पबला लागलेल्या आगीत २० जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्यामुळे शहरातील हॉटेल, बारमधील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न नागपुरातही ऐरणीवर आला. महापालिकेने मागील महिन्यांत धरमपेठेतील अनधिकृत रुफ नाईन या टेरेसवरील हॉटेलवर कारवाई केली. अग्निशमन विभागाने ही बाब गांभीर्याने घेतली असून २८ मार्चपर्यंत शहरातील २०३ हॉटेल्स, बारला नोटीस बजावली.

विशेष म्हणजे या हॉटेल्स, बारमध्ये नागरिकांच्या जीवाच्या सुरक्षेसंदर्भात कुठल्याही उपाययोजना केली नसल्याने नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे पैसा कमविण्याच्या नादात हॉटेल्स, बारमालकांकडून नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचेच दिसून येत आहे. एवढेच नव्हे २२ बार, रेस्टॉरेंट तर जीर्ण इमारतीत असून त्या केव्हाही कोसळण्याची शक्‍यता आहे. या इमारतीतून दूर निघून जाण्यास नोटीसद्वारे सांगण्यात आले आहे. मात्र, नोटीसनंतरही ही हॉटेल्स, बार धडाक्‍यात सुरू असून आता प्रत्यक्ष कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. 

१४ बार व रेस्टॉरेंटला सुरक्षा यंत्रणा अपुरी असून ती दुरुस्त न केल्याने वीजपुरवठा व पाणीपुरवठा खंडित करण्याबाबत नोटीस देण्यात आली आहे.

१,४२८ इमारतींना नोटीस 
शहरातील १,४२८ उंच इमारतींना अग्निशमन सुरक्षा यंत्रणा नसल्याने नोटीस बजावण्यात आली. याशिवाय ५५३ इमारती जीर्ण असून त्या खाली करण्यासंदर्भातही अग्निशमन विभागाने नोटीस बजावली. परंतु अग्निशमन विभागाकडून केवळ नोटीसची औपचारिकता पूर्ण करण्यात येत असून प्रत्यक्ष कारवाई केली जात नसल्याने जीर्ण इमारतीतील नागरिकांचा जीव धोक्‍यात असल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com