एका क्‍लिकवर मोजणार हाडांची घनता

एका क्‍लिकवर मोजणार हाडांची घनता

नागपूर - मेडिकलमध्ये दीडशे कोटीच्या पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजनेअंतर्गत सत्तरपेक्षा अधिक कोटीची यंत्रसामग्री मेडिकल, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आली आहे. त्यात पुन्हा डेक्‍सा स्कॅनरची भर पडली आहे. हाडे ठिसूळ झाल्याने तसेच लहान मोठ्या दुखापतींमुळे हाड मोडते. ही बाब लवकर लक्षात येत नाही. अशावेळी डेक्‍सा स्कॅनच्या मदतीने हाडे मोडण्यापूर्वीची घनता मोजता येईल. मेडिकलमध्ये डेक्‍सा स्कॅनर हे अद्ययावत निदान यंत्र लावण्यात आले. 

डेक्‍सा स्कॅनर अर्थात ड्युअल एनर्जी एक्‍सरे ॲब्लॉस्प्रिओमिटरी या उपकरणामुळे एका क्‍लिकवर हाडांची घनता मोजणे शक्‍य होईल. मेडिकलमधील औषध वैद्यकशास्त्र विभागाच्या अपघात विभागात सोमवारी अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्या उपस्थितीत हे उपकरण लावण्यात आले. या निदान यंत्र ऑस्टिओपॅनिया, ऑस्टिओपोरोसिस तसेच रजोनिवृत्तीमुळे हाडांची घनता कमी होणाऱ्या रुग्णांसाठी वरदान ठरणार आहे. हाडांची घनता कमी होत असलेल्या व्यक्तींचे विशेषतः महिलांचे छोट्या-छोट्या दुखापतीमुळे हाडे मोडून जाण्याचे प्रकार घडतात. याकडे नेहमीच दुर्लक्ष होते. मात्र, अशा रुग्णांना मेडिकलमध्ये आता लाभ मिळेल. डेक्‍सा स्कॅनर एक्‍सरे मशीनप्रमाणे एका क्‍लिकवर हाडांची घनता मोजेल. त्यासाठी कोणत्याही रक्ताच्या चाचण्यांची  गरज नाही, असे विभागप्रमुख डॉ. योगेंद्र बनसोड यांनी सांगितले. याशिवाय एक्‍सरेच्या तुलनेत या उपकरणातून होणारा किरणोत्सर्गाचा धोका कमी आहे. त्यामुळे रुग्णांनादेखील अतिरिक्त किरणोत्सर्गाचा सामना करावा लागणार नाही.

डेक्‍सा स्कॅनरवर चाचण्या सुरू करण्यात आल्या. या सेवेचे शुल्क अद्याप ठरविण्यात आले नाही. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अशाप्रकारची निदान सुविधा उपलब्ध झालेले मेडिकल राज्यात पहिले आहे. मेडिसीन, बालरोग, स्त्री रोग, अस्थिरोग आणि ऑस्टिओपोरोसीसग्रस्त रुग्णांना याचा लाभ मिळेल. 
-डॉ. अभिमन्यू निसवाडे, अधिष्ठाता, मेडिकल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com