कॅम्पसचे प्रवेशद्वार अडीच तास बंद

विद्यापीठ कॅम्पससमोर आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी चर्चा करून त्यांची समजूत काढताना पोलिस अधिकारी.
विद्यापीठ कॅम्पससमोर आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी चर्चा करून त्यांची समजूत काढताना पोलिस अधिकारी.

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसरातील विभागांत पाण्याची सुविधा नाही, योग्य स्वच्छता नाही, मुलींच्या ‘कॉमन रुम्स’ची दुरवस्था, वसतिगृहाची समस्या, विभागांमध्ये असुविधा अशा अनेक मागण्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थ्यांनी अडीच तास विद्यापीठ परिसरातील मुख्य प्रवेशद्वार बंद करीत आंदोलन केले. यावेळी प्रवेशद्वाराबाहेर घोषणाबाजी करीत विद्यार्थ्यांनी निदर्शने केली. त्यामुळे विभागातील बहुतांश प्राध्यापक प्रवेशद्वाराबाहेर ताटकळत उभे होते. आंदोलनामुळे अमरावती मार्गावरील वाहतूकही काही वेळ खोळंबली होती. 

विद्यापीठ परिसरात जवळपास ३५ विभाग आहेत. या सर्वच विभागात पिण्याच्या पाण्याची  व्यवस्था नाही. यासोबतच विभागातील प्रसाधनगृहांमध्येही स्वच्छता नसते. वॉटर कुलरची सफाई होत नसल्याने तिथेही घाण दिसून येते. मुलींचे वसतिगृह परिसरापासून खूप लांब असल्याने व या मार्गावर बस सुविधा नसल्याने मार्गावरून बस सुविधा सुरू करण्यात यावी आणि अनेक मागण्यांसाठी महिन्याभरापूर्वीच विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सि. प. काणे यांची संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन निवेदन सादर केले होते. त्यावर कुलगुरूंनी लवकरात लवकर या समस्या सोडविण्याचे आश्‍वासन दिले होते. महिनाभरानंतरही त्यावर कारवाई होत नसल्याने  विद्यार्थी संघटनेच्या शेकडो विद्यार्थ्यांनी सकाळी दहा वाजता ‘कॅम्पस’बाहेर एकत्र येऊन प्रवेशद्वार बंद केले. दरम्यान, विभागात येणारे प्राध्यापक आणि विद्यार्थीही बाहेर अडकले. विद्यार्थी संघटनेच्या शंभर दोनशे पदाधिकाऱ्यांनी हातात फलक घेऊन घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. विद्यार्थ्यांनी मागण्यांसाठी प्रवेशद्वाराजवळ अडीच तास ठाण मांडून प्रशासनाला हादरवून सोडले. याची माहिती विद्यापीठाला मिळताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली. विद्यार्थ्यांचा रोष लक्षात घेता अखेर कुलगुरू, प्र-कुलगुरू व कुलसचिवांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून घेत, जाणून घेतल्या. यावेळी चर्चेत सादर केलेल्या मागण्यांपैकी बऱ्याच मागण्या पूर्ण झाल्याचे सांगून कुलगुरूंनी विद्यार्थ्यांना फटकारले. तसेच काही मागण्यांवर लवकरात लवकर चर्चा करून सोडविण्याचे आश्‍वासन दिले. शिष्टमंडळात अध्यक्ष समीर महाजन, महेश बन्सोड, प्रतीक बनकर, भूषण वाघमारे, मंगेश भैसारे, स्नेहल वाघमारे, महेश लाडे, शबीना शेख, विवेक तिमांडे, प्रिया कोबे सहभागी झाले होते.

पुतळ्यासाठी निधी संघटनेनेच द्यावा
विद्यापीठ परिसराला महात्मा जोतिबा फुले यांचे नाव असल्याने परिसरात महात्मा फुले यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटनेतर्फे करण्यात आली. यावर पुतळ्याला विद्यापीठ प्रशासनाची काहीच हरकत नसून व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार संघटनेला पुतळ्यासाठी आवश्‍यक निधी स्वत: खर्च करायचे असल्याचे कुलगुरूंनी सांगितले. याशिवाय विद्यार्थ्यांच्या समस्या आणि सूचनांसाठी प्रत्येक विभागात ‘कम्प्लेंट ॲण्ड सजेशन बॉक्‍स’ लावण्याची मागणीही कुलगुरूंनी मान्य केली. आंतरराष्ट्रीय सेमिनारसाठी संशोधक विद्यार्थ्यांना प्रवास खर्च देण्याच्या मागणीलाही कुलगुरूंनी हिरवी झेंडी दाखविली. आंदोलनात विद्यापीठाच्या विविध विभागांच्या शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

बुधवारी आंदोलनाद्वारे मांडण्यात आलेल्या विविध मागण्यांपैकी बहुतांशी मागण्या कुलगुरू डॉ. सि. प. काणे यांनी मान्य केल्या. अनेक समस्यांवर कुलगुरूंनी त्वरित निर्णय घेऊन वेळेवरच त्या मान्य करून विद्यार्थ्यांना दिलासा दिला. मूलभूत सुविधा सोडविणे महत्त्वाचे नसून त्याची नियमित देखरेखही महत्त्वाची आहे. मान्य करण्यात आलेल्या मागण्या सातत्याने सुरू राहिल्यास विद्यार्थ्यांना फायदा होईल.
- समीर महाजन, अध्यक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटना.

बहुतांश मागण्या अगोदरच पूर्ण केल्या आहेत. काही मागण्यांसाठी विद्यापीठाची अडचण  असल्याने त्या पूर्ण करण्यासाठी थोडा वेळ लागेल. त्याबद्दल अगोदरच संघटनेला सर्व माहिती दिली आहे. असे असताना ज्या मागण्या पूर्ण केल्यात त्या मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन करणे ही योग्य बाब नाही. 
- डॉ. सि. प. काणे, कुलगुरू, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com