विदर्भातील कलावंतांना मिळेल हक्काचे व्यासपीठ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

‘सकाळ’च्या वृत्तावर दिग्दर्शक-कलावंतांनी व्‍यक्‍त केल्‍या उत्स्फूर्त प्रतिक्रिया
नागपूर - विदर्भात चित्रपट कलावंत आणि तंत्रज्ञांची संख्या खूप आहे. पण, ते संघटित नाहीत. महामंडळाची शाखा झाल्यानंतर सर्व एका व्यासपीठावर एकत्र येतील आणि त्याच माध्यमातून रोजगारही मोठ्या प्रमाणात निर्माण होईल. अखिल भारतीय मराठी चित्रपट  महामंडळाची शाखा नागपुरात येणे ही चांगल्या दिवसांची नांदीच म्हणता येईल, अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया चित्रपटसृष्टीतील कलावंतांनी ‘सकाळ’च्या बातमीवर दिल्या आहेत.  

मी प्रत्यक्ष या क्षेत्रात काम केले आहे आणि करतेय. ‘मला आई व्हायचंय’ आणि ‘प्रकाश बाबा आमटे ः द रिअल हीरो’ या दोन्ही चित्रपटांचे विदर्भात शूटिंग करताना मुंबईहून ३०० ते ४०० लोकांना तंत्रज्ञान हाताळण्यासाठी आणावे लागले होते. विदर्भात शाखा झाल्यानंतर नट-नट्या  आणि दिग्दर्शकांसह असंख्य तंत्रज्ञ तयार होतील आणि त्यांना आपल्याच गावात रोजगारही  मिळेल. लाइट्‌स, कॅमेरा, रेकॉर्डिंग स्टुडिओ सारेकाही आपल्याकडे आहे. खूप मोठा रोजगार यातून निर्माण होईल. महामंडळाची शाखा होणे यापेक्षा मोठी आनंदाची गोष्ट नाही. चित्रनगरीच्या दिशेने पडलेले पाऊलच म्हणता येईल.
- समृद्धी पोरे, निर्माता-दिग्दर्शक

नागपूरमध्ये अनेक निर्माते-दिग्दर्शक व कलावंत आहेत. पण, महामंडळाची शाखा  नसल्याने त्यांना मुंबईकडे धाव घ्यावी लागते. तसेच विदर्भातील अनेक कलावंत तंत्रज्ञ मुंबईमध्ये राहतात. त्यांनादेखील नागपूरमध्ये शाखा व्हावी, असेच वाटत होते. 
- विनोद डवरे, लेखक-दिग्दर्शक , दस्य केंद्रीय सेन्सॉर बोर्ड

गेल्या काही वर्षांपासून नागपूरमध्ये चित्रपट निर्मितीचे कार्य जोमात सुरू आहे. हव्या त्या बजेटमध्ये नागपुरातील कलावंत काम करीत आहेत. त्यात अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची शाखा नागपुरात येणे ही अतिशय आनंदाची बाब आहे. मुंबईला जाऊन महामंडळाचे सदस्य होणे हे सर्वांनाच शक्‍य होत नव्हते. आता नागपूरमध्ये दर्जेदार चित्रपटनिर्मिती व्हायला काही हरकत नाही. कारण नागपूरमध्ये चांगले कलावंत, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ बरेच आहेत. या सर्वांना महामंडळाची शाखा व्यासपीठ उपलब्ध करून देईल, अशी अपेक्षा आहे.
- श्‍याम धर्माधिकारी, अभिनेते-दिग्दर्शक

उत्तम काम होत आहे. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाची शाखा नागपुरात आल्यानंतर विदर्भातील अनेक कलावंत-दिग्दर्शक जोडले जातील. बहुतांश कलावंतांना सभासद होता येईल. विदर्भातील स्थानिक कलावंतांना मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होईल, यात शंका नाही.
- रणजित जोग

Web Title: nagpur vidarbha news Candidates of Vidarbha get the right forum