मुख्यमंत्र्यांच्या दत्तक गावात कुपोषणाचा बळी?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जुलै 2017

आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांचा तातडीने दौरा
नागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या अमरावती जिल्ह्यातील मेळघाट तालुक्‍यातील गावात कुपोषणामुळे पाच वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.

आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांचा तातडीने दौरा
नागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या अमरावती जिल्ह्यातील मेळघाट तालुक्‍यातील गावात कुपोषणामुळे पाच वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.

घोटा या गावातील सुमित जांबेकर या पाच वर्षीय मुलाचा कुपोषणामुळे अमरावती येथील जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. जिल्हा प्रशासनाने यासंबंधीचा अहवाल मुख्यमंत्री कार्यालयाला पाठविला आहे. अमरावतीचे जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी या मुलाच्या मृत्यूच्या कारणांचा शोध घेण्यासाठी चौकशी समिती स्थापन केली आहे.

सुमित जांबेकर या मुलाला धारणीजवळ असलेल्या हरिसाल प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू होते. येथे सुमितच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली होती. परंतु, काही दिवसांनी पुन्हा सुमितची प्रकृती बिघडल्याने त्याला अमरावती येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु तेथेच त्याचा मृत्यू झाला. कुपोषणामुळे बालकाचा मृत्यू झाल्याने सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत बुधवारी तातडीने मेळघाटला भेट देणार आहेत. या भेटीत ते मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या चारही गावातील बालकांच्या कुपोषणाच्या स्थितीचा आढावा घेणार आहेत.

मुख्यमंत्र्यांनी मेळघाट तालुक्‍यातील घोटा, भुलेरी, राणामालूर व बेसावर्डा ही चार गावे दत्तक घेतली आहेत. या गावातील सोईसुविधांवर मुख्यमंत्री कार्यालयातून लक्ष ठेवले जाते. मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी जातीने लक्ष ठेऊन असतात. तरीही कुपोषित बालके असल्याचे उघड झाल्याने जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे.

Web Title: nagpur vidarbha news Chief Minister's adopted village victim of malnutrition?