पाल्य शाळेत गेल्यावर सुरक्षित आहे किंवा नाही?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

नागपूर - दिल्लीतील रेयान पब्लिक स्कूलमध्ये झालेल्या विद्यार्थ्याच्या हत्याकांडानंतर पालकांच्या मनामध्ये शेकडो प्रश्‍न निर्माण झाले आहेत. पाल्य शाळेत गेल्यावर सुरक्षित आहे किंवा नाही? पाल्यासोबत कोण असेल? थोडा उशीर झाला तर काय झाले असेल? शिक्षक व्यवस्थित वागत असतील की नाही? असे अनेक प्रश्‍न पालकांच्या मनात आहेत. पालकांना पाल्यांची चिंता आणि शाळा प्रशासनाकडे संशयाच्या नजरेने पाहत आहेत. हीच बाब हेरून पोलिस आयुक्‍त डॉ. के. वेंकटेशम यांनी पालकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून भावनिक आवाहन केले आहे.

डॉ. वेंकटेशम यांनी ट्‌विटरवरून विद्यार्थ्यांच्या पालकांना सूचना केल्यात. यामध्ये प्रत्येक पालकाने शाळांमध्ये वेळोवेळी भेटी द्यायला हव्या. पालकांनी पाल्याच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही आहेत की नाही, याची खात्री करायला हवी. शाळेतील सीसीटीव्ही जर चालू नसतील तर सुरू करण्याबाबत मुख्याध्यापकांना विनंती करावी. दोन महिन्यांचा डीव्हीआर डाटा सांभाळण्यास सांगावे. ज्या शाळेत सीसीटीव्ही नाहीत, तेथे सीसीटीव्ही लावण्यासाठी विनंती करावी. 

शाळा व्यवस्थापनाने शाळेतील शिक्षक, शिक्षिका, लिपिक, चपराशी, बस ड्रायव्हर आणि कंडक्‍टर, आया किंवा शाळेतील कामगार महिला तसेच अन्य शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पोलिसांकडून तपासणी, पडताळणी करून घेण्यास सांगावे. शाळा प्रशासनाने शाळेच्या परिसरात अवैधरीत्या येणाऱ्या कॅब, बसेस, ऑटो, कार आणि अन्य खासगी वाहनांना बंदी घालावी. शाळा प्रशासनाने प्रमाणित केलेल्या वाहनांनाच परिसरात प्रवेश द्यावा.

स्कूलबसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा आणि स्पीड कंट्रोलर लावण्यात यावा. 
शाळेत महिन्यातून एकदा ‘गुड टच अँड बॅड टच’ याबाबत एक अभ्यासात्मक सेमिनार किंवा कार्यक्रम घ्यावा. प्रत्येक पालकांनी मुलांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवावे. शाळेतील दैनंदिनीबाबत रोज त्याच्याशी चर्चा करावी. शाळेतील घडामोडी आणि मित्रांबाबत माहिती घेत राहावी. त्यामुळे मुलांवर अप्रत्यक्षरित्या ‘वॉच’ राहील.

पालकांनो घाबरू नका... आम्ही तुमच्या पाठीशी आहोत
दिल्लीतील घटना उघडकीस आल्यानंतर पालकांमध्ये खळबळ उडाली. मात्र, पालकांनो घाबरू नका... नागपूर पोलिस तुमच्या पाठीशी आहोत..अशी आर्त हाक पोलिस आयुक्‍त डॉ. के. व्‍यंकटेशम यांनी दिली आहे. सध्या वाहतूक पोलिसांना शाळा-महाविद्यालयात पाठविण्यात येत आहेत. तेथील स्कूलबसेस आणि अन्य वाहनांची तपासणी करण्यात येत आहेत. त्याचे व्हिडिओ शूटिंग करण्यात येत आहे. येत्या १५ सप्टेंबरला शाळा व्यवस्थापन-प्रशासनासोबत बैठक ठेवण्यात आली आहे. या बैठकीत पोलिस उपायुक्‍त दर्जाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आम्हीसुद्धा तुमच्या पाठीशी असल्याची प्रतिक्रिया त्यांनी ‘सकाळ’ला दिली.

Web Title: nagpur vidarbha news Is child safe when you go to school?