गल्लीत भांडण दिल्लीत आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

नागपूर - प्रदेशाध्यक्षांवर शाई फेकणाऱ्या, महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांना पाडणाऱ्या आणि गडकरींच्या वाड्यावर हजेरी लावणाऱ्या शहरातील काँग्रेस नेत्यांची हकालपट्टी करण्यासाठी शहर काँग्रेसने दिल्लीत शंखनाद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. कोण वाड्यावर नियमित जातो, शाई कोणी फेकली याचे फोटोसह पुरावेसुद्धा काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे सोपविणार असल्याचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी सांगितले. 

नागपूर - प्रदेशाध्यक्षांवर शाई फेकणाऱ्या, महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांना पाडणाऱ्या आणि गडकरींच्या वाड्यावर हजेरी लावणाऱ्या शहरातील काँग्रेस नेत्यांची हकालपट्टी करण्यासाठी शहर काँग्रेसने दिल्लीत शंखनाद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. कोण वाड्यावर नियमित जातो, शाई कोणी फेकली याचे फोटोसह पुरावेसुद्धा काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे सोपविणार असल्याचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी सांगितले. 

शहर काँग्रेसमध्ये सध्या घमासान सुरू आहे. माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत आणि अनीस अहमद या त्रिकुटातर्फे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे खच्चीकरण करण्यासाठी विदर्भ काँग्रेस समितीची स्थापना करण्याची मागणी केली जात आहे. याकरिता काही नेते दिल्लीत गेले आहेत. याशिवाय इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व नेत्यांना एकत्रित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या कार्यक्रमाला सोनिया गांधी यांना बोलावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यास प्रत्युत्तर देण्यासाठी शहर काँग्रेसच्या वतीने त्रिकुटांचे कारनामे दिल्लीच्या निदर्शनास आणून दिले जाणार आहेत. 

महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारसभेत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती. ते कोणाचे कार्यकर्ते होते हे सर्वांनाच ठाऊक आहेत. त्यांची नावेही आमच्याकडे आहेत. 

महापालिकेच्या निवडणुकीत त्रिकुटाने उघडपणे काँग्रेस उमेदवाराच्या विरोधात प्रचार केला. तसेच प्रसिद्धिपत्रकावर अपक्ष उमेदवारांचे फोटो प्रकाशित करून त्यांना समर्थनसुद्धा जाहीर केले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाड्यावरही काही नेते वारंवार हजेरी लावतात. एका नेत्याने आपल्या शिक्षणसंस्थेसाठी त्यांच्याकडून अनुदानही मिळविले आहे.

मुख्यमंत्र्यांना स्वतःच्या महाविद्यालयात बोलावले, त्यांच्या कामाची मुक्तकंठाने प्रशंसा केली एवढेच नव्हे, तर मुख्यमंत्रिपदी कायम राहावे, अशी जाहीर सदिच्छासुद्धा व्यक्त केली. यामुळे हे नेते कोणाच्या इशाऱ्यावर चालतात आणि कुठल्या पक्षासोबत निष्ठा ठेवतात, हे सिद्ध होते. यांचे सर्व पुरावे आम्ही गोळा केले आहेत. ते दिल्ली येथे आंदोलनात उघड केले जातील तसेच सोनिया गांधी यांच्या हवाली केले जातील. दसऱ्यानंतर आंदोलन केले जाणार असल्याचे विकास ठाकरे यांनी सांगितले.

२६ सप्टेंबरला आंदोलन
काँग्रेसच्या बुधवारी झालेल्या बैठकीत पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात २६ सप्टेंबरला आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रभाग क्रमांक ३५ मधील पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवाराच्या पाठीशी ताकदीनिशी उभे राहून निवडणूक जिंकण्याचाही इरादा व्यक्त केला.

Web Title: nagpur vidarbha news congress agitation