नोकरी देता की घरी जाता

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 एप्रिल 2018

राहुल गांधी यांच्याच नेतृत्वात देशात सरकार आल्यावर संविधान आणि लोकशाही वाचविण्याचे काम होईल. युवक काँग्रेसच्या पुढाकाराने बेरोजगारांचे झालेले आंदोलन राज्यभर आणि देशभर करावे. 
- नाना पटोले, माजी खासदार

नागपूर - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे आश्‍वासन दिले. प्रत्यक्षात रोजगार मिळण्याऐवजी दिवसेंदिवस ते घटतायेत. आतापर्यंत मोदींची प्रत्येक  घोषणा ही ‘जुमला’ ठरली आहे. मोदींच्या धोरणांमुळे तरुणांवर बेरोजगार होण्याची पाळी आल्याने या विरोधात नागपूर लोकसभा युवक काँग्रेस, रामटेक लोकसभा युवक काँग्रेस व नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया (एनएसयुआय) यांच्यातर्फे शिक्षित बेरोजगार युवकांनी रविवारी (ता. १) एल्गार मोर्चा काढून ‘आता नोकरी देता की घरी जाता’ असा इशारा भाजप सरकारला दिला. 

रविवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ ते यशवंत स्टेडियमपर्यंत युवक काँग्रेसच्या वतीने ‘एल्गार मोर्चा’ काढण्यात आला. नागपूर विद्यापीठासमोर मोदी सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. या वेळी पदवीधर युवकांनी गळ्यात टोपले लटकावून पकोडे आणि भजे विकले. युवक काँग्रेसच्या झेंड्यावरील ‘वक्त है बदलाव का’ हे ब्रीद वाक्‍य युवकांना प्रेरणादायी ठरत होते. या वेळी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव व नगरसेवक बंटी शेळके हे हातात माईक घेऊन युवकांना ‘आता तरी जागे व्हा’, असे आवाहन करीत होते. मोर्चात शेकडो युवक  हातात फलक घेऊन भाजप सरकारचा निषेध करताना दिसून आले. ‘फेकू सरकार, फेकू सरदार’ अशा विविध घोषणांचा यावेळी समावेश होता. विशेष म्हणजे ‘उलटा कमळ’ करून ‘युटर्न’ सरकार अशा घोषणाही युवक देत होते. 

दरम्यान, यशवंत स्टेडियम परिसरात मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. या वेळी काँग्रेसचे माजी खासदार अविनाश पांडे, नाना पटोले, अखिल भारतीय युवक काँग्रेसच्या महासचिव प्रमिला रघुवंशी, आमदार सुनील केदार, काँग्रेसच्या अनुसूचित जाती सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन राऊत, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, माजी आमदार अनीस अहमद, विरोधीपक्षनेते तानाजी वनवे, रवींद्र दरेकर, अशोक धवड, नितीन कुंभलकर, नरेंद्र जिचकार, अतुल कोटेचा उपस्थित होते. 

देशभरातील युवकांना पंतप्रधानांनी पाच वर्षांत दहा कोटी रोजगार देऊ असे आश्‍वासन दिले. ते  चार वर्षांनंतरही पूर्ण झालेले नाही. मोदींचे प्रत्येक आश्‍वासन आता खोटे ठरत आहेत. २०१९ मध्ये युवक त्यांना त्यांची जागा दाखविणार आहेत. केवळ काँग्रेस युवकांना रोजगार देऊ शकते. राहुल गांधी हे युवकांचे नेतृत्व पुढील काळात राहणार आहे. 
- अविनाश पांडे, माजी खासदार

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पन्नास हजारांवर युवकांना रोजगार देण्याच्या गप्पा मारतात. आता रोजगार कुठे आहे. वेगळा विदर्भाचेही आश्‍वासन दिले. आता ते शक्‍य नसल्याचे सांगतात.  शिवाय विदर्भातील विविध सरकारी खात्यातील ५० टक्के पदे रिक्त ठेवली आहेत. 
- नितीन राऊत, अध्यक्ष, राष्ट्रीय अनुसूचित जाती सेल, राष्ट्रीय काँग्रेस.

मध्य नागपुरात काढली रॅली 
मध्य नागपुरात काँग्रेसने रॅली काढून केंद्र व राज्य सरकारविरोधी घोषणा दिल्या. माजी मंत्री अनिस अहमद, प्रदेश काँग्रेस सचिव अतुल कोटेचा यांच्या नेतृत्वात काढलेल्या रॅलीतून सरकारच्या अपयशाकडे लक्ष वेधण्यात आले. केंद्र सरकार तरुण व व्यापाऱ्यांना धमकावत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी नगरसेवक जुल्फकार अहमद भुट्टो, सायदा निजाम अन्सारी, आशा नेहरू उके, अनीश मिसाल, दुर्गेश प्रधान, प्रमोद मोहडीकर, प्रमोद शुक्‍ला, गौतम कम्बड्डे, अश्विन जवेरी, हर्ष जैन, कार्तिक जैन, वसीम शेख, पवन धानुका, रियाज काजी आदी उपस्थित होते.

गटबाजीचे दर्शन 
शहर काँग्रेसला गटबाजीने पोखरल्यानंतरही नेत्यांत अद्यापही समन्वयाची भूमिका नसल्याचे या मोर्चातून दिसून आले. आमदार सुनील केदार, बंटी शेळके यांनी काढलेल्या या मोर्चात माजी मंत्री विलास मुत्तेमवार समर्थक गायब दिसून आले. मुत्तेमवार गटातील एकही नगरसेवक, कार्यकर्ता या मोर्चाकडे फिरकला नाही. सतीश चतुर्वेदी यांच्यावर निलंबनाच्या कारवाईनंतर शहर काँग्रेस एकसंघ होईल, अशी अपेक्षा केली जात होती. मात्र, या मोर्चानिमित्त काँग्रेसच्या चाहत्यांची अपेक्षा फोल ठरली.

Web Title: nagpur vidarbha news congress elgar morcha politics