संविधान बदलाचा विचार करणेही देशद्रोह - मुख्यमंत्री फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

नागपूर - "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधानासारखे अस्त्र दिले. संविधानाने संधीची समानता दिली आहे. जगातील अनेक देशांच्या संविधानाचा मी अभ्यास केला असून, भारताचे संविधान जगात सर्वोत्तम आहे. यामुळे संविधान बदलण्याचा नुसता विचार करणे हा देशद्रोह ठरेल,' असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केले.

नागपूर - "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधानासारखे अस्त्र दिले. संविधानाने संधीची समानता दिली आहे. जगातील अनेक देशांच्या संविधानाचा मी अभ्यास केला असून, भारताचे संविधान जगात सर्वोत्तम आहे. यामुळे संविधान बदलण्याचा नुसता विचार करणे हा देशद्रोह ठरेल,' असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्‍टोबर 1956 साली कोट्यवधी अस्पृश्‍यांना तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांचा धम्म दिला. त्या धम्मक्रांतीचा 61 वा वर्धापन दिन सोहळा दीक्षाभूमीवर साजरा झाला. या वेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. अध्यक्षस्थानी भन्ते आर्य नागार्जुन सुरई ससाई होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर केवळ संविधान निर्माते नव्हते, तर ते राष्ट्रनिर्माते होते. त्यांच्या संविधानामुळे भारत देश बलशाली राष्ट्र म्हणून उभे आहे. संविधानाने देशाला सामाजिक ऐक्‍यातून शक्ती दिली आहे.'' बुद्धांच्या विचारातूनच भारत देश महासत्ता बनेल, असा विश्‍वासही फडणवीस यांनी व्यक्त केला. तसेच दीक्षाभूमी विकासाचा 100 कोटींचा मास्टर प्लॉन तयार केला असल्याचेही त्यांनी सांगितले. दीक्षाभूमीचा आणखी विकास करण्याची गरज असल्याचे मत भदंत नागाजुर्न सुरई ससाई यांनी केली. प्रास्ताविक सदानंद फुलझेले यांनी केले. या वेळी केंद्रीय भूपृष्ठ व जहाज बांधणीमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आणि इतर नेते उपस्थित होते.

बाबासाहेबांनी मंत्रिमंडळात काम करताना देशाच्या विकासाचे 11 व्हिजन डॉक्‍युमेंट तयार केले होते. नदीजोड प्रकल्पाचे ते शिल्पकार म्हणून बाबासाहेबांचेच नाव पुढे आले. ही संकल्पना त्या काळात त्यांनी मांडली होती.
- नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री

हिंदू आणि बौद्ध एकत्र आल्यास देशात होणारे संघर्ष सहज टाळता येतील. भारतासह जगातील अनेक राष्ट्रांत बौद्ध धम्म आहे. त्यामुळे पाली भाषेला संविधानाच्या अनुसूचित समावेश करावा.
- रामदास आठवले, केंद्रीय राज्यमंत्री

Web Title: nagpur vidarbha news To consider the constitutional change, treason