क्‍लासेसच्या मनमानीवर लागणार लगाम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

‘ऑनलाइन प्रिपरेशन पोर्टल’ सुरू होणार - जेईई, नीटचे मार्गदर्शन 

‘ऑनलाइन प्रिपरेशन पोर्टल’ सुरू होणार - जेईई, नीटचे मार्गदर्शन 
नागपूर - देशासह राज्यभरात क्‍लासेसचे पीक आले आहे. वैद्यकीय प्रवेशासाठी  असलेली ‘नीट’, आयआयटीसाठी जेईई तर अभियांत्रिकीसाठी एमएचसीईटी या स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना क्‍लासेसवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे कॉलेजमध्ये कमी आणि क्‍लासेसमध्येच विद्यार्थ्यांची भरगच्च संख्या दिसते. या कारणाने क्‍लासेसची मक्तेदारी  वाढत आहे. यास लगाम लावण्यासाठी राज्याच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने ‘ऑनलाइन प्रिपरेशन पोर्टल’ सुरू करण्यात येणार आहे. यावर विद्यार्थ्यांना  जेईई, नीट आणि एमएचसीईटी या परीक्षांचे प्रिपरेशन करता येणे शक्‍य होईल. 

राज्यात दरवर्षी हजारो मुले ‘नीट’,‘जेईई’ आणि ‘एमएचसीईटी’ या प्रवेश पात्रता परीक्षेसाठी तयारी करीत असतात. त्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांचे वैद्यकीय प्रवेश, आयआयटीमध्ये जाण्याचे स्वप्न असते. त्यासाठी पालक शहरातील सर्वोत्तम क्‍लासेसमध्ये पाल्याला प्रवेश मिळावा यासाठी प्रयत्नरत असतात. 

त्यातूनच काही क्‍लासेसची मक्तेदारी वाढली आहे. त्यामुळे पालकांकडून मनमानी शुल्काची वसुली करून कॉलेजशी ‘टाय-अप’ करीत आपल्या उद्देश साध्य करण्याचे  काम क्‍लासेसकडून केले जाते. ही मक्तेदारी तोडण्यासाठीच माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून ‘ऑनलाइन प्रिपरेशन पोर्टल’ सुरू करण्यात येणार आहे. ‘पोर्टल’मध्ये अकरावी आणि बारावीच्या भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित व संख्याशास्त्र आणि जीवशास्त्र विषयांची ऑनलाइन प्रश्‍नपेढी तयार करण्यात येईल. हे प्रश्‍न बहुपर्यायी असणार असणार आहेत. त्यासाठी शिक्षक, विषयतज्ज्ञ यांना प्रश्‍न तयार करून टाकण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या प्रश्‍नांची तपासणी मंडळातील तज्ज्ञांकडून केली जाईल. त्यामुळे ज्या  विद्यार्थ्यांना नीट आणि जेईईसारख्या प्रवेश पात्रता परीक्षांसाठी सराव करता येणार आहे.

३० सप्टेंबरपर्यंत नोंदवा प्रश्‍न
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून ‘ऑनलाइन प्रिपरेशन पोर्टल’वर प्रश्‍न नोंदविण्यासाठी http:/neetqb.mh-hsc.ac.in हे संकेतस्थळ देण्यात आले  आहे. या संकेतस्थळावर तज्ज्ञ शिक्षकांना आपले प्रश्‍न ३० सप्टेंबरच्या आता नोंदवायचे आहे. 

Web Title: nagpur vidarbha news control on classes