नगरसेवक ग्वालवंशीला अटक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 जून 2017

नागपूर - शहरासह ग्रामीण भागात भूमाफिया म्हणून प्रचंड दहशत निर्माण करणारा काँग्रेस नगरसेवक हरीश ग्वालवंशी याला गुन्हे शाखा पोलिसांनी आज अटक केली. गिट्टीखदान पोलिस ठाण्यात त्याच्यासह इतरांविरुद्ध २७ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून  तो फरार होता. त्याने अटकपूर्व जामीन मिळण्याकरिता अनेक प्रयत्न केले होते. 

गिट्टीखदान ठाण्यात हरीशसह, शैलेश ग्वालवंशी, अलोक महादुले व इतर १५ ते २० जणांविरुद्ध भूखंडाच्या प्रकरणात गुन्हा दाखल आहे.

फिर्यादी संजयसिंग सिद्धुसिंग बैस राऊत ले-आउट केशवनगर गोधनी रोड यांनी नर्मदा को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या मालकीचे दोन भूखंड खरेदी केले होते. सुरक्षेच्या दृष्टीने दोन्ही  भूखंडांना कुंपण घातले होते. 

मात्र, हरीश ग्वालवंशीची त्यांच्या भूखंडांवर नजर गेली. बैस यांच्याकडून त्याने तो बळकावला. परत पाहिजे असल्यास सात लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. एसआयटीमार्फत तपास करून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी ग्वालवंशीला अटक करण्यात आली. तर इतर आरोपी अद्याप फरार आहेत. 

कोट्यवधींची माया
पश्‍चिम नागपुरात राहणाऱ्या हरीश ग्वालवंशीचा पूर्व इतिहास बघितल्यास, त्याचे प्राथमिक शिक्षण बोरगाव येथील प्राथमिक शाळेत झाले. सुरुवातीला तो घरोघरी जाऊन दूध विकायचा. त्यानंतर त्याने काही दिवस ट्रकचालक म्हणून काम केले. कळमेश्‍वरातील गोळीबार प्रकरणानंतर  त्याचे नाव चर्चेत आले. यानंतर कुख्यात गुंड म्हणून तो नावारूपास आला. यानंतर प्रॉपर्टी  व्यवसायाकडे वळला. गुंडांना हाताशी धरून दहशत निर्माण करणे, जमिनी बळकावणे असे त्याच्यावर आरोप होत गेले. मात्र, त्यावेळच्या भ्रष्ट पोलिस यंत्रणेमुळे त्याचे फावले. तो अल्पावधीतच कोट्यवधींचा मालक बनला.

नेत्यांना महागड्या गाड्या भेट
गुंडगिरी करून बस्तान बसविल्यानंतर स्वसंरक्षणासाठी हरीश ग्वालवंशी राजकारणात सक्रिय  झाला. काही नेत्यांना हाताशी धरून काँग्रेसची उमेदवारी मिळविली. अलीकडेच महापालिकेच्या निवडणुकीत तो निवडूनसुद्धा आला. काँग्रेसची उमेदवारी मिळविण्यासाठी हरीशने शहरातील दोन बड्या नेत्यांना महागड्या गाड्या भेट दिल्याची चर्चा आहे. 

ग्वालवंशीच्या दहशतीचा अंत
शहरात हरीश ग्वालवंशी, दिलीप ग्वालवंशी यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांनी जमिनी बळकावून तसेच दादागिरी करून शहरात प्रचंड दहशत निर्माण केली होती. मात्र, पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमून ग्वालवंशी कुटुंबीयांचा  कायमचा बंदोबस्त केला. दिलीप ग्वालवंशीच्या टोळीवर मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल केल्याने शहरातील इतर भूमाफियांचे धाबे दणाणले आहे.

Web Title: nagpur vidarbha news corporator harish gwalvanshi arrested