वासनांध पित्याची जन्मठेप कायम

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

नागपूर - पिता-पुत्रीच्या पवित्र नात्याला काळिमा फासत सतत दोन वर्षे मुलीवर वारंवार अत्याचार करणाऱ्या वासनांध पित्याची जन्मठेप गुरुवारी (ता. २१) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली. रामेश्‍वर श्रावण इवनाते (वय ४०, रा. कामठी) असे आरोपी पित्याचे नाव आहे.

नागपूर - पिता-पुत्रीच्या पवित्र नात्याला काळिमा फासत सतत दोन वर्षे मुलीवर वारंवार अत्याचार करणाऱ्या वासनांध पित्याची जन्मठेप गुरुवारी (ता. २१) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली. रामेश्‍वर श्रावण इवनाते (वय ४०, रा. कामठी) असे आरोपी पित्याचे नाव आहे.

मुलीची आई ती एक वर्षाची असताना मरण पावली. यामुळे रामेश्‍वर आणि सतरा वर्षीय पीडित मुलगी असे दोघेच जण राहायचे. पीडित मुलगी इयत्ता आठवीत असताना सन २०११ मध्ये या वासनांध पित्याने पहिल्यांदा मुलीवर अत्याचार केला. त्या वेळी तो दारूच्या नशेमध्ये होता. मुलीने पित्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला; परंतु जिवे मारण्याची धमकी दिल्याने मुलगी घाबरली. पहिल्यांदाच गुदरलेला हा प्रसंग मुलीने दुसऱ्या दिवशी शेजारी राहणारी मानलेली आजी सिंधूबाई बावणे यांना सांगितला. मात्र, वडिलांच्या भीतीमुळे तिनेदेखील याबाबत कुठेही वाच्यता केली नाही. यामुळे निर्ढावलेल्या वडिलाने दोन वर्षांदरम्यान वेळोवेळी मुलीवर अत्याचार केला.

पीडित मुलगी ८ नोव्हेंबर २०१३ रोजी खरांगणा येथे राहणारा मामा मारोती उईके यांच्याकडे आली. तिथे आत्या सुमित्रा उईके यांनी तिला पोट मोठे दिसत असल्याबाबत विचारणा केली असता पीडितेने सर्व हकिकत सांगितली. यानंतर मामाने पीडितेला घरी नेऊन सोडून दिले. यानंतर मुलीच्या वडिलांनी तिला राजू ब्राह्मणे यांच्या शेतावर रात्री झोपायला जाण्यास सांगितले. त्या वेळी गस्तीवर असलेले पोलिस तिथे पोहोचले.

त्यांनी विचारपूस करून तिला पोलिस ठाण्याला नेले. यानंतर ९ नोव्हेंबर २०१३ रोजी मुलीच्या सांगण्यावरून तिच्या मामा-मामीला बोलाविण्यात आले आणि वडिलाने केलेल्या अत्याचाराबाबत तक्रार नोंदविली. यानुसार पोलिसांनी पित्यावर अत्याचाराचा गुन्हा नोंदविला. या प्रकरणी सत्र न्यायालयाने आरोपीला जन्मठेप ठोठावली. त्याविरुद्ध त्याने उच्च न्यायालयात अपील केले. परंतु, प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेत उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा आदेश कायम ठेवला. या प्रकरणी सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी वकील नितीन रोडे यांनी बाजू मांडली.

Web Title: nagpur vidarbha news crime