बनावट कॉल सेंटरचा भंडाफोड

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 जून 2017

शासकीय नोकरीचे आमिष - हजारो उमेदवारांना फसविले 

शासकीय नोकरीचे आमिष - हजारो उमेदवारांना फसविले 

नागपूर - शासकीय नोकरी लागल्याचे कॉल लेटर पाठवून महाराष्ट्रासह विविध राज्यांतील हजारो बेरोजगार उमेदवारांना फसविणाऱ्या बनावट कॉल सेंटरचा सायबर क्राइम विभागाने भंडाफोड केला. आंतरराज्य स्तरावर कार्यरत असलेल्या या रॅकेटमधील दोन मास्टर माइंड आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून शासनाचे सही, शिक्‍के असलेले शेकडो बनावट नियुक्‍तिपत्रे आणि अन्य साहित्य जप्त केले. प्रवीणकुमार वाल्मिकी प्रसाद (वय ४४, रा. ग्रामसंगत, ता. बिहार शरिफ-बिहार) आणि अरुण विनोद त्रिवेदी (वय ३२, रा. भोजपूर, ता. सिरैनी, जि. रायबरेली-उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्या दोन्ही आरोपींची नावे आहेत. 

मुख्य आरोपी प्रवीणकुमारने इंजिनिअरिंग (माइन) शिक्षण घेतले असून, तो चंद्रपुरात खाणीत काम शोधण्यासाठी आला होता. तर दुसरा आरोपी अरुण त्रिवेदी हा दहावीपर्यंत शिकलेला असून तो चंद्रपुरातील नांदगाव पोळे येथे ब्यूटीपार्लर प्रशिक्षण केंद्र चालवीत होता. मात्र, त्या माध्यमातून तो भलताच व्यवसाय करीत होता. त्या माध्यमातून आंबटशौकीन असलेल्या प्रवीणकुमारशी ओळख झाली. प्रवीणकुमार हा आठ वर्षांपूर्वी नॅशनल डिजिटल लिटरसी मिशन (एनडीएलएम) या शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात काम करीत होता. त्याला शासनाच्या विविध योजनाच्या माध्यमातून बेरोजगारांपर्यंत पोहोचून फसवणूक करण्याची कल्पना सुचली. त्याने ब्यूटीपार्लरचा ट्रेनर अरुण त्रिपाठीला हाताशी धरले. 

काही पैसे गोळा करून चंद्रपुरात त्याने बनावट कॉल सेंटर उघडले. ३ कॉम्प्युटर, कलर प्रिंटर, लॅपटॉप, शासकीय बनावट कागदपत्रे, स्टॅंपपेपर, शिक्‍के इत्यादी विकत घेतले. तेथून त्याने केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर अन्य राज्यांतील बेरोजगार युवकांशी संपर्क साधून शासकीय नोकरी देण्याचा सपाटा सुरू केला. त्याने आतापर्यंत अडीच हजार बेरोजगार युवकांशी संपर्क साधून प्रत्येकाकडून ३ ते पाच हजार रुपये प्रोसेसिंग फी म्हणून घेतले आहेत. 

असे होते कॉल सेंटर
चंद्रपुरात आलिशान कार्यालयात ९ मुली आणि दोन मुले अशी अकरा युवांची टीम तयार केली होती. त्यांना फोनवर कसे बोलायचे? काय सांगायचे? काय माहिती विचारायची? याबाबत प्रशिक्षण दिले. सर्वांना दोन-दोन मोबाईल दिले. सकाळपासून ते सायंकाळपर्यंत युवकांना कॉल करून नोकरी लागल्याची माहिती देण्यात येत होती. त्यासाठी चार बॅंकेतील खाते क्रमांक देऊन पैसे भरण्यास सांगण्यात येत होते. या सर्व मुली आणि युवकांना केवळ ३ हजार रुपये वेतन आणि दिवसभराचा जेवण आणि अन्य खर्च दिल्या जात होता.

असा लागला छडा
गड्डीगोदाम-गौतमनगरात राहणारा नवीन शशिधरन या युवकाने एका वृत्तपत्रात प्रधानमंत्री कौशल विकास योजनेअंतर्गत शासकीय नोकरीची मेगा भरती अशी जाहिरात वाचली. ती जाहिरात प्रवीण कुमारने दिली होती. त्याखाली केवळ मोबाईल नंबर होता. त्यावर नवीनने मे २०१७ ला कॉल केला. त्याला आधारकार्ड, रेशनकार्ड आणि शैक्षणिक कागदपत्र ई-मेलने पाठविण्यास सांगितले. त्याने कागदपत्रे पाठविल्यानंतर त्याच मोबाईलवरून नोकरीसाठी निवड झाल्याचा कॉल आला. त्यासाठी त्याला एका बॅंकेत साडेचार हजार रुपये भरण्यास सांगण्यात आले. मात्र, त्यानंतर तो मोबाईल बंद आढळून आला. त्यामुळे त्याने सायबर क्राइमचे संतोष माने आणि प्रशांत भरते यांच्याशी संपर्क केला.

परप्रांतातीलही बेरोजगारांची फसवणूक
प्रवीणकुमारच्या टोळीने आतापर्यंत एकूण २,४०८ बेरोजगारांना गंडा घातला. त्यामध्ये नागपुरातील १०६, पुणे ११० आणि नाशिकमधील १०८ युवकांचा समावेश आहे. यासोबतच गुजरातमधील अमदाबाद, उत्तर प्रदेशातील मेरठ आणि गोव्यातीलही युवकांना या टोळीने नोकरीच्या नावाने गंडा घातला. 

सिम कार्डसाठी बेरोजगारांचेच आधारकार्ड
प्रवीणकुमार याने नोकरीचे नियुक्‍तिपत्र पाठविण्यापूर्वी ई-मेलने बेरोजगारांना आधारकार्ड पाठविण्यास सांगितले होते. त्याच आधारकार्डचा वापर करून त्याने जवळपास ४० सिमकार्ड विकत घेतले होते. तो वेगवेगळ्या सीमकार्डवरून युवकांना फोन करण्यास सांगत होता. त्यामुळे आधारकार्डचा आणखी कुठे गैरवापर केला काय? याचा तपास सायबर क्राइम करीत आहेत.

Web Title: nagpur vidarbha news crime on bogus call center