नगरसेविका लक्ष्मी यादवसह कुटुंबीयांवर गुन्हे दाखल

नगरसेविका लक्ष्मी यादवसह कुटुंबीयांवर गुन्हे दाखल

नागपूर - कामगार कल्याण महामंडळाचे अध्यक्ष आणि भाजपचे माजी नगरसेवक मुन्ना यादव, नगरसेविका पत्नी लक्ष्मी मुन्ना यादव यांच्यासह दोन्ही मुलांनी शेजारी राहणाऱ्या नातेवाईक कुटुंबीयांवर शस्त्रांनी हल्ला करीत जिवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना गंभीर जखमी केले. या प्रकरणी नगरसेविका लक्ष्मी यादव आणि तिच्या कुटुंबीयांविरूद्ध धंतोली पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हे दाखल केले. राजकीय संरक्षणामुळेच मुन्ना यादव आणि त्याची मुले शहरात गुंडागर्दी करीत असल्याची चर्चा दिवसभर होती.

मुन्ना यादवचा मुलगा करण यादव हा शनिवारी रात्री साडेनऊ वाजता शेजारी राहणारे अवधेश ऊर्फ पापा नंदनलाल यादव (वय ३४, प्रतापनगर) यांच्या अंगणात जाऊन मित्रांसोबत फटाके फोडून जोरजोरात ओरडत होते. त्याच्या त्रासाला कंटाळून अवधेश यांच्या बहिणीने बाहेर येऊन फटाके न फोडण्याबाबत हटकले. त्यावर करण यादवने अश्‍लील शिवीगाळ केली. तसेच नगरसेविका लक्ष्मी यादव, मुन्ना यादव, अर्जुन यादव, बाला यादव यांना बोलावले. हे सर्व जण अवधेश यांच्या घरात घुसले. त्यांच्या बहिणीचे केस धरून मारहाण करीत जिवे मारण्याची धमकी दिली. तासाभरात अवधेश यादव हे घरी आले. घरात बहिणीला मारहाण केल्याचे लक्षात येताच ते जाब विचारण्यासाठी मुन्ना यादवला भेटण्यासाठी गेले. अजनी चौकात अजित बेकरीसमोर मुन्ना यादव, अर्जुन यादव, करण यादव, बाला यादव आणि लक्ष्मी यादव यांनी अवधेशवर तलवार, रॉड, दगड, हॉकी स्टीकने हल्ला करीत जिवे मारण्याचा प्रयत्न केला. अवधेश यांना वाचविण्यासाठी मंगल यादव, प्रदीप यादव, सागर यादव आणि करण मुदलिया यांनी धाव घेतली. त्यांच्यावरही मुन्ना यादव आणि त्याच्या मुलांनी जबर हल्ला करीत गंभीर जखमी केले. या प्रकरणी धंतोली पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हे दाखल केले. 

ठाण्यात आणि चुनाभट्टीत तणाव 
मंगल यादव आणि मुन्ना यादव हे दोघे नातेवाईक आहेत; पण त्यांच्यात हाडवैर आहे. दोघेही वेगवेगळ्या राजकीय पक्षांशी जुळलेले आहेत. मंगल आणि मुन्ना यांनी एकमेकांवर सशस्त्र हल्ला केल्यामुळे अजनी चौक, चुना भट्‌टी परिसरात तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर दोन्ही गटांतील युवक धंतोली पोलिस ठाण्यात पोहोचले. पोलिस ठाण्यातही पोलिस कर्मचाऱ्यांसमोर दोन्ही गटांनी एकमेकांना शिवीगाळ करीत तणाव निर्माण केल्याची माहिती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com