कॅश व्हॅन लूट प्रकरणाचा पर्दाफाश

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑगस्ट 2017

तमिळनाडूतून दोघांना अटक - रोख ११ लाख जप्त; टोळीच्या म्होरक्‍यासह तीन आरोपी फरार

तमिळनाडूतून दोघांना अटक - रोख ११ लाख जप्त; टोळीच्या म्होरक्‍यासह तीन आरोपी फरार

नागपूर - झाशी राणी चौक येथील कॅश व्हॅन लूट प्रकरणाचा छडा लावण्यात धंतोली पोलिसांना यश आले. या प्रकरणात तमिळनाडूतील त्रिची येथून दोन आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ११ लाखांची रोख हस्तगत करण्यात आली. टोळीच्या म्होरक्‍या कुमारन बालसुब्रमन्यमसह तीन आरोपी फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे. मंजन ऊर्फ मंजुनाथन श्रीनिवासन आणि कालेय ऊर्फ मुर्थी करूथदुरई अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. मोहन मनिक्कम आणि श्रावनन मनिक्कम हे तिघे फरार आहेत. आरोपींनी ११ जुलै रोजी झाशी राणी चौकातील बॅंक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी आलेल्या कॅश व्हॅनमधून १४ लाखांची रोख पळविली होती.

अगदी नियोजनबद्धरित्या एका आरोपीने पैसे फेकून व्हॅनचालकाचे लक्ष विचलित केले. दुसऱ्याने मागे उभ्या बंदूकधारी सुरक्षा रक्षकाला बोलण्यात गुंतवले. तिसऱ्याने रक्कम असलेली पेटी गाडीबाहेर काढून चौथ्याकडे दिली. त्याने आधीच ऑटोत बसून असलेल्या पाचव्या आरोपीपर्यंत पेटी पोहोचवून दिली. यानंतर आरोपी वेगवेगळ्या दिशेने निघून गेले. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजमध्ये हा संपूर्ण घटनाक्रम आणि आरोपींचे चेहेरे कैद झाले. केवळ हाच धागा आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिस आरोपींपर्यंत पोहोचले. धंतोली पोलिसांच्या पथकाने त्रिची येथून दोघांच्याही मुसक्‍या आवळल्या. त्यांच्या ताब्यातून २ हजार आणि ५०० च्या नोटांच्या स्वरूपात असलेले एकूण ११ लाख ७ हजार ५०० रुपये रोख जप्त करण्यात आली. शिवाय आरोपींच्या बॅंक खात्यातील ९९ हजार ९०९ रुपये गोठविण्यात आले असल्याची माहिती धंतोलीच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक सीमा मेहेंदळे यांनी दिली.

सात जणांच्या पथकाने मोहीम केली फत्ते
घटना पुढे येताच पोलिसांनी विविध बाबींचा तपास सुरू केला. काही आरोपी मथुरेच्या दिशेने गेल्याचे पुढे येताच पोलिसांचे पथक मथुरेच्या दिशेने रवाना झाले. तिथून आरोपी निसटले. पण, तपासात उपयोगी धागेदोर हाती लागले. यानंतर पोलिस निरीक्षक सीमा मेहेंदळे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक रवी राजुलवार, कमलाकर गड्डीमे, विरेंद्र गुळरांधे, सुरेश जाधव, सुशील रेवतकर, विनोद वडस्कर, अश्‍विनी भामले, रिता कुमरे यांचे पथक तामिळनाडूला रवाना झाले. भाषेची अडचण असूनही स्थानिक नागरिकांना विश्‍वासात घेऊन या पथकाने मोहीम फत्ते केली. त्रिची लुटारूंचा बालेकिल्ला असल्याची सर्वांनाच माहिती आहे. आरोपींच्या शोधात देशभरातील पोलिस येतात. मात्र, सहकार्याअभावी त्यांना माघारी परतावे लागते.

१३ व्या एटीएममध्ये झाला घात
बॅंक ऑफ इंडियाने एटीएममध्ये पैशांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सिस्को कंपनीला दिली आहे. घटनेच्या दिवशी सिस्कोच्या कर्मचाऱ्यांनी किंग्जवे येथील मुख्यालयातून एकूण १ कोटी ५ लाखांची रोख घेतली. १२ ठिकाणी पैसे भरल्यानंतर व्हॅन झाशी राणी चौकात पोहोचली. बुटीबोरी येथील १४ व्या एटीएममध्ये भरण्यासाठी असलेले १४ लाखच व्हॅनमध्ये शिल्लक होते. 

आरोपींची कार्यपद्धती 
आरोपींच्या माहितीनुसार त्रिची या छोट्याशा गावातील बहुतेक युवक अल्पशिक्षित असून, हेच काम करतात. ५ ते १० सदस्यांचा समावेश असलेल्या अनेक टोळ्या आहेत. एटीएमच्या कॅश व्हॅन त्यांचे ‘टार्गेट’ आहेत. एकाला शहरांमध्ये पाठवून रेकी केली जाते. त्यानंतर ठरलेल्या दिवशी सर्व आरोपी एकत्र येतात. कमीतकमी वेळेत व्हॅनमधील रोख लुटून वेगवेगळ्या दिशेने पसार होतात. प्रत्येक सदस्याची जबाबदारी आणि कामानुसार वाटा पूर्वीच निश्‍चित असतो. पुढच्या लुटीच्या योजनेसाठी ३० टक्के रक्कम काढून उर्वरित पैसे ठरलेल्या टक्‍क्‍यांनुसार वाटून दिले जातात. नावाची कुठेही नोंद होऊ नये याची संपूर्ण काळजी घेतली जाते. बक्कळ पैसे असूनही हॉटेलमध्ये थांबत नाहीत. रेल्वेच्या जनरल बोगीतून प्रवास करतात. 

Web Title: nagpur vidarbha news criminal arrested in cash van loot