सायबर गुन्हेगारांच्या टार्गेटवर ज्येष्ठ

अनिल कांबळे
सोमवार, 2 एप्रिल 2018

नागपूर - एटीएम कार्ड, क्रेडिट कार्ड बंद पडल्याची थाप देऊन सायबर गुन्हेगार ज्येष्ठ नागरिकांना गंडविण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होते. शासकीय सेवेतून निवृत्त आणि उच्चशिक्षित ज्येष्ठ नागरिकसुद्धा सायबर गुन्हेगारांचे बळी ठरत आहेत. बॅंकिंग प्रणाली आणि तंत्रज्ञानाची योग्य माहिती नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना गंडविणे सोपे जात आहे. ज्येष्ठ नागरिकांची ऑनलाइन फसवणूक करण्याच्या २० टक्‍के घटना राज्यात घडल्याची नोंद आहे.

नागपूर - एटीएम कार्ड, क्रेडिट कार्ड बंद पडल्याची थाप देऊन सायबर गुन्हेगार ज्येष्ठ नागरिकांना गंडविण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होते. शासकीय सेवेतून निवृत्त आणि उच्चशिक्षित ज्येष्ठ नागरिकसुद्धा सायबर गुन्हेगारांचे बळी ठरत आहेत. बॅंकिंग प्रणाली आणि तंत्रज्ञानाची योग्य माहिती नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना गंडविणे सोपे जात आहे. ज्येष्ठ नागरिकांची ऑनलाइन फसवणूक करण्याच्या २० टक्‍के घटना राज्यात घडल्याची नोंद आहे.

पोलिस आयुक्‍त डॉ. के. वेंकटेशम्‌ यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी अनेक सकारात्मक उपाययोजना केल्या आहेत. ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी सायबर क्राईम जनजागृतीसुद्धा करीत आहे. तरीही बॅंक, विमा कंपनी, फॉरेनवरून आलेली भेटवस्तू आणि लॉटरीच्या नावाखाली वृद्धांची फसवणूक केली जाते. 

अजनीत राहणाऱ्या एका सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्याला एटीएम कार्ड बंद पडल्याच्या नावाखाली साडेसहा लाखांनी गंडविल्याची घटना उघडकीस आली आहे. ‘अमूक बॅंकेतून बोलतोय..तुमच्या एटीएमची सेवा समाप्त झाली आहे... कृपया एटीएम पासवर्ड सांगा...’ अशा प्रकारचा संवाद साधून ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक केली जात आहे. बॅंकेतून फोन असल्यामुळे विश्‍वासाने वृद्ध साहजिकच सर्व माहिती सांगतात. तेथेच त्यांची फसवणूक होते. हा गंडा घालण्याचा नवा ट्रेंड असल्याचे सायबर क्राईमतज्ज्ञ सांगतात.

तसेच विमा पॉलिसीच्या नावाखाली वृद्धांना गुंतवणुकीच्या दुप्पट पैसा देण्याची स्किम सांगतात. अशा आमिषांना वृद्ध बळी पडतात आणि त्यांची फसवणूक होते. यासोबतच अनेक ज्येष्ठ नागरिकांना फेसबुक,  ट्विटर आणि व्हॉट्‌सॲपवरही मुलींच्या नावाचा प्रोफाईल ठेवून आर्थिक लुबाडणूक करतात. राज्यभरात वृद्धांच्या 

ऑनलाइन फसवणुकीच्या २० टक्‍के घटनांची नोंद आहे.

वृद्धांनी अशी घ्यावी काळजी
- अनोळखी फोनला प्रतिसाद देऊ नये
-अनोळखी ई-मेल्स, फेसबुक फ्रेंड्‌स रिक्‍वेस्ट स्वीकारू नका
- एटीएमचा पासवर्ड कुणालाही सांगू नका
- पासवर्ड मोबाईलमध्ये सेव्ह करू नका
- एटीएममधून पैसे काढताना कुणाची मदत घेऊ नका
- बॅंकेतून फोन असल्याचे सांगितल्यास फोन कट करावा
- एटीएम बंद पडल्याचे सांगितल्यास बॅंकेत स्वतः जाऊन चौकशी करण्याचे सांगावे
- विमा काढायचा सल्ला दिल्यास थेट नकार द्यावा
- लाखोंची लॉटरी लागल्याचा फोन आल्यास विश्‍वास ठेवू नका

पासवर्ड लक्षात राहत नाही. तसेच दृष्टी योग्य नसते. त्यासाठी कुणाची मदत घ्यावी लागते. ऑनलाइन व्यवहार करणे धोक्‍याचे आहे. ज्येष्ठ नागरिक सॉफ्ट टार्गेट असल्याने वृद्ध लुटल्या जातात. त्यामुळे फोन आल्यास बोलूच नव्हे किंवा फोन कट करावा.
- हुकूमचंद मिश्रीकोटकर 

वृद्धांची फसवणूक होऊ नये म्हणून जनजागृती केली जाते. वृद्धांचे विरंगुळा केंद्र, संघटना, ज्येष्ठांच्या सभा आणि ज्येष्ठ नागरिक मंडळांमध्ये जाऊन फसवणूक होऊ नये म्हणून कार्यक्रम घेतले जातात. शहरात ठिकठिकाणी जनजागृतीचे फलक लावले जातात. ज्येष्ठांनी संभाव्य धोके लक्षात घेता १०० नंबर किंवा ज्येष्ठ नागरिक सेलच्या ०७२-२२३३६८० या क्रमांकावर फोन करावा.  
- प्रशांत भरते, सहायक पोलिस निरीक्षक, सायबर क्राईम

Web Title: nagpur vidarbha news cyber crime old people target