विकास गेला खड्डयात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

नागपूर - रस्ते हे विकासाची नाडी असतात. ग्रामीण भागातील रस्ते विकासासाठी अत्यंत उत्तम स्थितीत असणे अत्यावश्‍यक आहे. परंतु, नेमके या बाजूने विचार न करता त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. उमरेड तालुक्‍यातील सुकरी व हिंगणा तालुक्‍यातील कान्होलीबारा, गुमगाव रस्त्याची स्थिती फारच दयनीय झाली आहे. रस्त्यांच्या जर्जर अवस्थेमुळे वाहतूक करताना हाल होत असल्यामुळे रस्त्यांची स्थिती सुधारावी अशी प्रशासनाकडे मागणी करण्यात येत आहे.

नागपूर - रस्ते हे विकासाची नाडी असतात. ग्रामीण भागातील रस्ते विकासासाठी अत्यंत उत्तम स्थितीत असणे अत्यावश्‍यक आहे. परंतु, नेमके या बाजूने विचार न करता त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. उमरेड तालुक्‍यातील सुकरी व हिंगणा तालुक्‍यातील कान्होलीबारा, गुमगाव रस्त्याची स्थिती फारच दयनीय झाली आहे. रस्त्यांच्या जर्जर अवस्थेमुळे वाहतूक करताना हाल होत असल्यामुळे रस्त्यांची स्थिती सुधारावी अशी प्रशासनाकडे मागणी करण्यात येत आहे.

हिंगणा-कान्होलीबारा रस्ता उखडला 
वानाडोंगरी - हिंगणा तालुक्‍यातील विविध रस्त्यांची अवस्था अतिशय जर्जर झालेली असून गावातील अंतर्गत रस्तेसुद्धा अतिशय खराब झालेले आहेत.

दोन वर्षांपूर्वी लक्षावधी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या हिंगणा-गुमगाव रस्त्यासह हिंगणा-कान्होलीबारा रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे. तालुक्‍यातील हिंगणा-कान्होलीबारा रस्ता हा अतिशय महत्त्वाचा आहे. कान्होलीबारा हे तालुक्‍यातील मोठी लोकसंख्या असलेले आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे गाव आहे. या मार्गावरून मोंढा, सावंगी, देवळी, आमगाव, गोटाळी, नागाझरी, मांडवा, पिपळधरा, टाकळघाट, सावंगी (आसोला), सावळी-बिबी, धोकर्डा, देवळी पेंढरी तसेच वर्धा येथे प्रवास करणारे शेकडो प्रवासी आहेत. तसेच या सर्व गावात नोकरी करणारे जिल्हा परिषदेच्या शाळेचे शिक्षक, आरोग्य विभागाचे कर्मचारी, खासगी शाळांमध्ये कार्यरत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शेतकरी, विद्यार्थी या राज्य महामार्गाने दररोज प्रवास करतात. कान्होलीबारा वर्धा महामार्गावर देशातील प्रसिद्ध बृहस्पतीचे मंदिर आहे. तेथे दररोज अनेक भाविक भक्त प्रवास करतात. त्यामुळे हा तालुक्‍यातील अतिशय महत्त्वाचा रस्ता आहे.

रस्त्यावरील संपूर्ण गिट्टी उखडलेली आहे. त्याचप्रमाणे हिंगणा, गुमगाव, सालईदाभा मार्गावरून वडगाव गुजरला जाणारा रस्तासुद्धा खराब झालेला आहे. हिंगणा नागपूर मार्गावर वानाडोंगरी बसस्थानकाला लागून यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयापुढे टोलनाका आहे. दररोज हजारो वाहनांचा टोल वसूल केल्या जातो. पण, या रस्त्यांचीसुद्धा दयनीय अवस्था झालेली आहे. तेव्हा अधिकारी व पदाधिकारी यांनी  वृत्ताची दखल घेऊन हा रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी आहे.

सुकरी रस्त्यासाठी चार कोटी ९६ लाख मंजूर
चांपा - उमरेड तालुक्‍यात चांपा ग्रामपंचायतीमधील सुकरी गावाच्या रस्त्याचे काम गेल्या आठ महिन्यांपासून कासवगतीने सुरू झाले आहे. चार कोटी ९६ लाख रुपये शासनाने रस्त्यासाठी मंजूर केले आहे. बांधकाम सहा महिन्यांपासून सुरू झाले आहे. परंतु, आतापर्यंत रस्त्यांची कामे पूर्ण झालेली नाहीत. या रस्त्यावरून होणारा त्रास लक्षात घेता रस्ता लवकरात लवकर तयार करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

‘ओव्हरलोड’ वाहतुकीमुळे रस्त्याची हालत खस्ता झाल्याचे पाहावयास मिळते. ग्रामपंचायतीने  एक महिन्यापूर्वी ‘ओव्हरलोड’ ट्रकची वाहतूक बंद करण्याचा ठराव पास केला होता. परंतु, अजूनपर्यंत वाहतूक बंद झालेली नाही. ट्रकमालक यादव यांनी रॉयल्टी काढली असल्याचे सांगितले. या रस्त्यावरून त्यांची मनमानी सुरूच आहे, अशी गावकऱ्यांची तक्रार आहे. गावकऱ्यांना रस्ता कधी तयार होणार, असा प्रश्‍न पडला आहे. रुग्णालयात रुग्ण नेण्यासाठी बैलबंडीचा वापर करावा लागतो. प्रशासनाला कधी जाग येणार, सुकरी गावातील समस्या कधी सुटणार, शाळेतील मुलांना जायला रस्ता कधी होणार, असे प्रश्‍न या रस्त्यामुळे निर्माण झाले आहेत. चार किलोमीटरचा प्रवास या रस्त्याने पायी करावा लागतो. जंगलव्याप्त भागातून हा रस्ता गेला आहे. गावामध्ये येणाऱ्या जाणाऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागतो. भारताला स्वातंत्र्य मिळाले, गेल्या ७० वर्षांपासून हा रस्ता तयार करण्यात आला नाही. याचे शल्य गावकऱ्यांना वाटू लागले आहे.

Web Title: nagpur vidarbha news development issue