गरिबांच्या उपासमारीचे ‘डिजिटल’ कारण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017

पीओएस मशीन कुचकामी - ६० टक्के गरीब अन्नधान्यापासून वंचित; रेशन दुकानदारही त्रस्त 
नागपूर - अन्नधान्य पुरवठा विभागातर्फे सवलतीच्या दरात दिल्या जाणाऱ्या धान्य वितरणातील घोळ टाळण्यासाठी प्रत्येक स्वस्त धान्य दुकानांमध्ये डिजिटल पीओएस मशीन लावल्या. या मशीनमध्ये बोटांच्या ठशांची नोंद घेतल्यानंतर धान्य वाटप करण्यात येते. परंतु, स्वस्त धान्य दुकानातील या मशीन बंद पडल्या असून ६० टक्के गरीब अन्नधान्यापासून वंचित आहेत. 

पीओएस मशीन कुचकामी - ६० टक्के गरीब अन्नधान्यापासून वंचित; रेशन दुकानदारही त्रस्त 
नागपूर - अन्नधान्य पुरवठा विभागातर्फे सवलतीच्या दरात दिल्या जाणाऱ्या धान्य वितरणातील घोळ टाळण्यासाठी प्रत्येक स्वस्त धान्य दुकानांमध्ये डिजिटल पीओएस मशीन लावल्या. या मशीनमध्ये बोटांच्या ठशांची नोंद घेतल्यानंतर धान्य वाटप करण्यात येते. परंतु, स्वस्त धान्य दुकानातील या मशीन बंद पडल्या असून ६० टक्के गरीब अन्नधान्यापासून वंचित आहेत. 

राज्य शासनाच्या अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रक्रिया राबविण्यात येत आहे. वितरण प्रणालीचा धान्य वाटपात पारदर्शकता आणण्यासाठी रेशन दुकानात पीओएस मशीन लावण्यात आल्या. या प्रणालीद्वारे धान्य वितरण करणे सुरू आहे. मात्र, पीओएस मशीनने धान्य वितरण करण्यात अनेक अडचणी येत असल्याचा आरोप रेशन दुकानदारांचा आहे. या मशीनमध्ये १५ वर्षांखालील मुलांच्या बोटाच्या ठशांचे ‘व्हेरीफिकेशन’ होत नाही. 

काही कार्डधारकांच्या दहाही बोटाचे ठसे घेतल्यानंतरही पीओएस मशीनमध्ये त्याची नोंद होत नाही. अनेक कार्डधारकांचा ‘डाटा’ पीओएस मशीनमध्ये उपलब्ध नाही. खाण कामगार, घरकाम गडी, मेहनतीचे कामे करणाऱ्या कार्डधारकांच्या बोटाचे नोंदच होत नाही. 

काही भागामध्ये जीपीएस कनेक्‍टीव्हिटी उपलब्ध नसल्यामुळे ‘व्हेरीफिकेशन’ होत नाही. मशीनमधील डाटा इंग्रजीत असल्यामुळे कार्डधारकाला व दुकानदाराला समजणे कठीण जाते. मशीनचा वापर फारच किचकट असून वेळकाढू आहे. त्यामुळे कार्डधारकांना दुकानात बराच वेळ थांबावे लागते, असे अनेक घोळ पीओएस मशीनमुळे निर्माण झाले आहे. ५० ते ६० टक्के गरीब कार्डधारक धान्यापासून वंचित राहत असल्याचे दुकानदारांनी सांगितले.

अधिकाऱ्यांच्या हेकेखोरीला दुकानदार त्रासले 
३०-४० वर्षांपासून गरीब नागरिकांकडे रेशनकार्ड आहे. आधार कार्डही आहे. परंतु, रेशनकार्ड आधारकार्डशी लिंक झाले नसल्याने गरीब जनता धान्यापासून वंचित आहे. पीओएस मशीन दुकानदाराने वापरावी, मशीनमध्ये कार्डधारकाच्या नावाची चूक दुरुस्त करावी, व्हेरीफिकेशन झाले नाही तर त्यांना धान्य देऊ नये, अशा तोंडी सूचना पुरवठा अधिकारी दुकानदारांना देत आहेत. नियमानुसार सूचना लिखित देणे अनिवार्य आहे. तोंडी कारभारामुळे कार्डधारक व रेशन दुकानदार त्रासले असल्याचे ऑल महाराष्ट्र फेअर प्राइस शॉपकिपर्स फेडरेशनचे सचिव मोहनलाल शर्मा  यांनी सांगितले. 

पैसे भरून धान्य मिळत नाही 
अन्नधान्य वितरणातील घोळ कमी करण्यासाठी शासनाने द्वार पोच योजना सुरू केली. त्यात  रेशन दुकानदारांना आधी पैसे भरावे लागतात, नंतर त्यांच्या दुकानांपर्यंत धान्य पोहोचविले जाते. खासगी ठेकेदारांमार्फत हे काम केले जाते. मात्र, पैसे भरूनही दुकानदारांना धान्यच मिळाले नाही, अशीही अनेक दुकानदारांची तक्रार आहे. त्यामुळे अधिकारी व कंत्राटदारांनी या योजनेलाही सुरुंग लावल्याचे चित्र आहे.

पुरवठा विभागाने केले हात वर 
मशीनने कार्डधारकांचे व्हेरीफिकेशन करण्याची कामे रेशन दुकानदारांमार्फत करण्यात येत आहेत. मशीनद्वारे कार्डधारकाचे व्हेरीफिकेशन करण्याचे संपूर्ण कार्य पुरवठा विभागाचे आहे.  कार्डधारकाचे व्हेरीफिकेशन करण्याचे सर्व काम पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी करावे अन्यथा दुकानदार कार्डधारकांना कार्ड व्हेरीफिकेशनकरिता परिमंडळ झोन कार्यालयात पाठवतील. कार्यालयाने व्हेरीफाईड केल्यावरच त्यांना दुकानातून धान्य देण्यात येईल, असा निर्णय नुकताच पार पडलेल्या नागपूर रेशन दुकानदार संघाच्या बैठकीत घेण्यात आला.

Web Title: nagpur vidarbha news digital reason for poor hunger