नगररचना विभागातील अधिकाऱ्यांना अटक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 जुलै 2017

नागपूर - जरीपटक्‍यातील संजय धर यांच्या जुळ्या मुलांचा उच्च दाबाच्या वीजवाहिनीचा करंट लागून मृत्यू झाल्याप्रकरणी आरमोरर टाउन सिटी इमारतीच्या बांधकामाला मंजुरी देणाऱ्या मनपाच्या नगररचना विभागातील दोन अधिकाऱ्यांना जरीपटका पोलिसांनी अटक केली. सुरेश व्यंकटराव माहुरे (वय ५२, जागृती कॉलनी, काटोल रोड) आणि सुरेश भजे (वय ४६, रा. कुकडे ले-आउट) अशी या अधिकाऱ्यांची नावे आहेत. न्यायालयाने या दोघांनाही मंगळवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. यापूर्वी जरीपटका पोलिसांनी बिल्डर आनंद खोब्रागडेला अटक केली होती. या प्रकरणातील आरोपींची संख्या आता तीन झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या ३१ मे रोजी संजय धर यांची दोन्ही मुले पीयूष आणि प्रियांश (वय १२) ही कमाल चौक पाचपावलीतील रेसिडन्सीत राहणाऱ्या मावशीकडे आली होती. सायंकाळी दोघेही क्रिकेट खेळत होते. त्यांचा चेंडू इमारतीच्या शेजारी असलेल्या झाडावर अडकला. 

तो चेंडू काढण्यासाठी दोघांनीही लोखंडी रॉडचा वापर केला. त्यामुळे दोघांना उच्च दाबाच्या वीजवाहिनीतून प्रवाहित विजेचा धक्का लागला. दोघेही भाजल्याने गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दहा दिवसांपूर्वी पीयूषचा मृत्यू झाला, तर त्यानंतर तीन दिवसांनी प्रियांशचाही मृत्यू झाला. सुगतनगरातील आरमोरर टाउनशिप ही बिल्डर आनंद खोब्रागडे याने तयार केली होती. त्या वेळी मनपाचे तत्कालीन नगररचना विभागाचे अधिकारी सुरेश माहुरे आणि वामनराव भरते या दोघांनीही उच्च दाबाच्या वीजवाहिनी खाली बांधकामाला परवानगी देताना निकषाकडे दुर्लक्ष करीत मंजुरी दिली होती. त्यामुळे बिल्डरसह मनपाच्या नगररचना विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांवर जरीपटका पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. दहा दिवसांपूर्वी बिल्डर आनंद खोब्रागडेला अटक करण्यात आली होती. तर, शनिवारी रात्रीच्या सुमारास नगररचना विभागाच्या माहुरे आणि भरते या दोघांना अटक करण्यात आली.

आरोपींची संख्या वाढणार
मनपाच्या नगररचना विभागाचे माहुरे आणि भरते या दोन अधिकाऱ्यांसह अन्य दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इमारत बांधकाम मंजुरीपत्रावर सह्या केल्या होत्या, अशी माहिती सूत्रांनी दिली. तसेच झोन कार्यालयात अंतिम मंजुरीसाठी प्रकरण गेल्यानंतर झोन कार्यालयातील अधिकाऱ्यांनीही कोणतीही चौकशी न करता मंजुरी दिल्याचीही माहीती सूत्रांनी दिली. त्यामुळे या प्रकरणात आणखी आरोपी वाढण्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तवली आहे.

Web Title: nagpur vidarbha news District Magistrate arrested