कवितेतील आध्यात्मिकता धर्माचा प्रचार करत नाही - डॉ. गणेश देवी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017

नागपूर - 'दैनंदिन जीवनात गुंतलेला, सामाजिक असमानता, विषमता आदींवर विद्रोह मांडणारा कवी सौंदर्याचे भावही व्यक्त करतो. कवीची अशी अनेक रूपे आहेत. स्वतःच्या आणि काळाच्याही पुढे जाण्याचे भान पाळून माणुसकीही त्याला जिवंत ठेवायची असते. हीच त्याच्या कवितेतील आध्यात्मिकता आहे. ती कुठल्याही धर्माच्या चौकटीत नाही आणि धर्माचा प्रचारही करत नाही,' असे प्रतिपादन भाषा अभ्यासक व विचारवंत पद्मश्री डॉ. गणेश देवी यांनी आज येथे केले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन आणि विद्यापीठाचा इंग्रजी भाषा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने "आध्यात्मिकता आणि कविता' विषयावर त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे अध्यक्षस्थानी होते. डॉ. गणेश देवी यांनी विज्ञान, तंत्रज्ञान आणि शास्त्राच्या अंगाने आध्यात्मिकता व कवितेचे नाते उलगडून दिले. ते म्हणाले, "कविच्या आध्यात्मिकतेकडे गेली शंभर वर्षे दुर्लक्ष झाले आणि शास्त्राच्या ज्ञानाला अधिक महत्त्व देण्यात आले. आज भारतासह संपूर्ण जगात डिजिटल स्थित्यंतर होत असताना कविता अत्यंत उपयोगाची आहे. विश्‍वाच्या नवनव्या दिशा जेव्हा कवीच्या मानसिक प्रक्रियेत उलगडत जातात, तेव्हा त्याच्या कवितेत आध्यात्मिकता अनुभवायला मिळते.' "आपल्या देशाच्या साहित्यात असलेली आध्यात्मिकता इंग्रज आल्यानंतर कमी झाली. व्यक्त होताना अवघडलेपण वाटू लागले.

इंग्रजांच्या प्रभावामुळे तसे झाले असावे. रवींद्रनाथ टागोरांच्या जन्मानंतर साहित्यातून बोलू लागलेली आध्यात्मिकता पहिल्या महायुद्धानंतर पुन्हा मागे पडली. आज शंभर वर्षांमध्ये कदाचित प्रथमच या विषयावर जाहीर व्याख्यान होत असावे.'

Web Title: nagpur vidarbha news dr. ganesh devi talking