डॉ. रवींद्र शोभणे माझा मान ठेवतील! - डॉ. किशोर सानप

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

नागपूर - ‘पाच वर्षांपासून माझे नाव संमेलनाध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. पण मी प्रथमच पुढे आलो आहे. त्यामुळे मला ज्येष्ठ बंधू मानणारे डॉ. रवींद्र शोभणे माझा मान ठेवतील याचा मला विश्‍वास आहे,’ अशी भूमिका संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. किशोर सानप यांनी ‘सकाळ’कडे व्यक्त केली. एकदा एखादे काम हाती घेतले की ते निष्ठेने पूर्णत्वास नेतो, त्यामुळे निवडणुकीतून माघार घेणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. १४ ऑक्‍टोबरपर्यंत इच्छुक उमेदवारांना अर्ज दाखल करायचे आहेत. त्यामुळे या एका महिन्यात या ना त्या कारणाने साहित्य वर्तुळातील राजकारण तापणार, हे नक्की. डॉ. सानप म्हणाले, ‘रवींद्र शोभणे आणि मी विदर्भ साहित्य संघाचे कार्यकर्ते आहोत. त्यांच्या कादंबऱ्यांवर मी प्रदीर्घ लिखाण केले आहे. त्यांना थोडा वेळ आहे. त्यांनी वाट बघायला हरकत नाही. किती वेळा पाऊल मागे घेतले किंवा अर्ज मागे घेतला, याला अर्थ नसतो. योग्य वेळ यावी लागते आणि त्यांची वेळ नक्की येईल. ते माझ्या मताचा मान ठेवतील, अशी माझी भावना आहे.’

‘उत्तम कांबळे, नागनाथ कोत्तापल्ले, डॉ. सदानंद मोरे, डॉ. अक्षयकुमार काळे यांनी अध्यक्षपद भूषविले आहे. जुन्या पिढीतील ज्येष्ठ म्हणून सध्या माझे स्थान आहे. मी एक व्रतस्थ लेखक आहे. निवडणुकीला उभे होणे हे माझ्यासाठी वारंवार जमणारे काम नाही. तिथे तन-मन-धनाने काम करावे लागते.

त्यामुळे माघार न घेता हे काम मी निष्ठेने पूर्णत्वास नेणार. राजकारण करण्याची माझी मनःस्थिती नाही,’ असेही ते म्हणाले. समाजातील दुःखाच्या मुक्तीसाठी पर्यायी साहित्य व्यवस्था उभी करणे हे या पदाचे काम आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे समाजाच्या प्रबोधनाचे व्यासपीठ म्हणून बघतो, अशी भूमिकाही ते मांडतात. 

डॉ. शोभणे, राजन खान, रवींद्र गुर्जर हे सर्व उमेदवार तोडीचे आहेत. साहित्यात त्यांचे समर्थ योगदान आहे. प्रत्येकजण एकमेकांचा आदर ठेवण्याचा प्रयत्न करतील, असा विश्‍वास आहे.
- डॉ. किशोर सानप

Web Title: nagpur vidarbha news dr. kishor sanap talking