प्रतिभावंत लेखकच होईल संमेलनाध्यक्ष - डॉ. किशोर सानप

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

नागपूर - प्रतिभा आणि नैतिकतेचा आदर्श ठेवून निवडणूक लढवित आहे. मतदारांना या प्रतिभेची ‘आयडेंटिटी’ आहे. त्यामुळे ते मलाच निवडून देतील, असा विश्‍वास संत साहित्याचे अभ्यासक डॉ. किशोर सानप यांनी व्यक्त केला.

नागपूर - प्रतिभा आणि नैतिकतेचा आदर्श ठेवून निवडणूक लढवित आहे. मतदारांना या प्रतिभेची ‘आयडेंटिटी’ आहे. त्यामुळे ते मलाच निवडून देतील, असा विश्‍वास संत साहित्याचे अभ्यासक डॉ. किशोर सानप यांनी व्यक्त केला.

बडोदा येथे होणाऱ्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी १४ ऑक्‍टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. बडोदा, मुंबई आणि पुणे अशा तीन ठिकाणांहून अर्ज दाखल केल्यानंतर डॉ. सानप मंगळवारी (ता. १०) ‘होमग्राउंड’वर आले. साहित्य संघाचे सरचिटणीस विलास मानेकर यांच्याकडे त्यांनी अर्ज सोपविला. त्यांच्या अर्जावर माजी संमेलनाध्यक्ष प्रा. वसंत आबाजी डहाके यांची सूचक म्हणून स्वाक्षरी आहे. 

डॉ. रमेश अंधारे, कवी विष्णू सोळंके, डॉ. अविनाश मोहरीर, मोहम्मद कमर हयात आणि डॉ. राजेंद्र मुंढे यांच्या अनुमोदक म्हणून स्वाक्षरी आहेत.
निवडणुकीच्या रिंगणात असलेले डॉ. किशोर सानप व डॉ. रवींद्र शोभणे हे दोन्ही उमेदवार विदर्भाचे आहेत. त्यामुळे विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांचा कल कुणाकडे असतो, हे महत्त्वाचे ठरणार आहे.
मनोहर म्हैसाळकर यांनी आतापर्यंत समतोल निर्णय घेतलेले आहेत.

त्यांच्या निर्णयामागे दूरदृष्टी असते. इतर संस्थांमध्ये मला याचा अभाव वाटतो. त्यातही विदर्भ साहित्य संघाने मला आजवर खूप सन्मान दिला आहे. त्यामुळे मतदार माझ्या प्रतिभेचा सन्मान करतील याचा विश्‍वास आहे, असे डॉ. सानप म्हणतात. ‘बृहन्महाराष्ट्रातील मराठी साहित्यिकांचे योगदान’ आणि ‘सयाजीराव गायकवाड यांच्या वाङ्‌मय प्रतिभेची चिकित्सा’ हे दोन लेखन प्रकल्प हाती घेतल्याची माहितीही त्यांनी दिली.

सत्काराच्या शालीत रमणारा लेखक नाही
संमेलनाध्यक्षाचा कार्यकाळ एक वर्षाचा असला तरी काम करण्यासाठी कालावधीची मर्यादा नाही. साहित्य हे समाजाच्या दुःखमुक्तीसाठी हातभार लावणारे साधन आहे. मला आजवर मान-सन्मान व पुरस्कार खूप मिळाले आहेत. त्यामुळे निवडणूक जिंकलो किंवा हरलो तरी कार्य करीत राहणार आहे. मी सत्काराच्या शाली गुंडाळत मानधन मागणारा लेखक नाही, असे डॉ. किशोर सानप आवर्जून नमूद करतात.

Web Title: nagpur vidarbha news dr. kishor sanap talking