येत्या सत्रात ‘एम्स’चा श्रीगणेशा

येत्या सत्रात ‘एम्स’चा श्रीगणेशा

नागपूर - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्‍ट असलेले अखिल भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या (एम्स) मार्गातील सारे अडथळे दूर झालेत. पहिल्या वर्षाचे ५० विद्यार्थ्यांचे सत्राचे वर्ग जुलै २०१८ पासून सुरू होणार असून,  प्रयोगशाळेसह इन्फ्रास्ट्रक्‍चर उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. यासाठी आवश्‍यक दोन कोटींच्या प्रस्तावाला जिल्हा प्रशासनाने हिरवा कंदील दाखवला आहे. 

नागपुरात ‘एम्स’ उभारण्यात येईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये केली. तीन वर्षे लोटली. मिहान परिसरात जागा निश्‍चित झाली. मात्र, इमारत उभारण्याचे आव्हान मोठे असल्यामुळे तूर्तास मेडिकलमध्ये ‘एम्स’चे वर्ग सुरू करण्यासंदर्भात चाचपणी झाली. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी सकारात्मकता दाखवली. यामुळे या प्रक्रियेला अधिक  वेग आला. 

विशेष असे की, ‘एम्स’साठी आवश्‍यक २४८ पदांचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. निविदा प्रकाशनानंतर निवड प्रक्रिया सुरू होईल.

मिहानमधील ‘एम्स’ असे असेल
एम्समध्ये १२०० खाटांचे असेल. १४०० डॉक्‍टर असतील. शरीररचनाशास्त्र, बधिरीकरणशास्त्र, जीवरसायनशास्त्र, बायोफिजिक्‍स, बायोइंजिनिअरिंग, हृदयरोग, ॲनाटॉमी, न्यूरोलॉजी, नेफ्रोलॉजी, ऑर्थोपेडिक, सायक्रिएटरी, पेडियाट्रिक, पेडियाट्रिक सर्जरी, न्युक्‍लिअर मेडिसीन, फिजिओथेरपी, सेंटर फॉर कम्युनिटी मेडिसीन, गॅस्ट्रोएन्ट्रॉलॉजिस्ट, जेनेरिक मेडिसीन, हिमॅटोलॉजी, मेडिसीन, मायक्रोबायोलॉजी, युरोलॉजी, ट्रान्सफ्युजन मेडिसीन, इम्युनोलॉजी, सर्जिकल डिसिप्लीन, रिप्रॉडक्‍टिव्ह बायोलॉजी, पल्मनरी मेडिसीन, पॅथॉलॉजी, प्लास्टिक सर्जरीसह विषयातील सुपर स्पेशॅलिटी अभ्यासक्रम, रुग्णसेवेच्या अत्याधुनिक सोयी आणि संशोधनाचे विभाग, संशोधकांचे निवासी गाळे, सभागृह मिहान परिसरात तयार करण्यात येतील. या विषयांच्या अनुषंगाने मेडिकलमध्ये न्युक्‍लिअर मेडिसीन, पेडियाट्रिक सर्जरी, कम्युनिटी मेडिसीनचा दर्जा वाढविण्यासंदर्भात अधिष्ठाता डॉ. निसवाडे यांचे प्रयत्न सुरू आहेत.

मेडिकलमध्‍ये ‘एम्स’ कॅम्पस 
सहा एप्रिल २०१७ रोजी दिल्लीतील एम्सचे विशेष कार्य अधिकारी डॉ. महेश मिश्रा, आर्किटेक्‍ट वाजपेयी, प्रधानमंत्री आरोग्य सुरक्षा योजनेचे सुदीप श्रीवास्तव यांनी मेडिकलमधील सुविधांची पाहणी केली होती. विभागीय आयुक्त अनुपकुमार, डॉ. विरल कामदार यांनी मेडिकलमध्ये ‘एम्स’ कॅम्पस उभारण्यासंदर्भात सूचना केल्या. ५० विद्यार्थी क्षमता प्रवेशासाठी ४० हजार स्क्वेअर फूट जागा निश्‍चित करण्यात आली. शैक्षणिक सत्रासाठी तीन लेक्‍चर हॉल, तीन प्रयोगशाळा, अधिकाऱ्यांना निवासासाठी अधिष्ठातांच्या बंगल्यासह पाच बंगले आणि अन्य कर्मचाऱ्यांसाठी आणखी तीन बंगले हस्तांतरित करण्यात आले. अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी २ कोटींचा प्रस्ताव सादर केला. तत्काळ जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी हिरवी झेंडी दिली असल्याची माहिती दिली. 

मेडिकलमध्ये ‘एम्स’चे वर्ग सुरू होणार आहेत. जुलैमध्ये प्रवेश होतील. कॅम्पस तसेच प्रयोगशाळा उभारण्याच्या कामाला गती येईल. पदनिर्मिती झाली असून, टप्प्याटप्प्याने जागा  भरल्या जातील. एम्सचा लाभ मेडिकलमधील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापकांना होईल. ‘एम्स’मधील उपचार, संशोधनाचे काम कसे चालते हे अनुभवता येईल. मेडिकलचा शैक्षणिक दर्जा सुधारेल. मेडिकलच्या २०० खाटा एम्ससाठी ठेवण्यात येतील.
- डॉ. अभिमन्यू निसवाडे, अधिष्ठाता, मेडिकल

मेडिकलमध्ये एम्स कॅम्पस, २०० खाटा राखीव
५० विद्यार्थ्यांचे पहिल्या वर्षी प्रवेश
जिल्हा प्रशासनाकडून २ कोटींच्या निधीला हिरवा कंदील 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com