शेतकऱ्याचे मुंडण; भाजपचे खंडन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 जून 2017

मुख्यमंत्र्यांच्या दत्तक गावात कॉंग्रेस-भाजप आमनेसामने

मुख्यमंत्र्यांच्या दत्तक गावात कॉंग्रेस-भाजप आमनेसामने
नागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या फेटरी गावात सतीश चौधरी या शेतकऱ्याने मुंडण करून सरकाचा निषेध नोंदवला. त्याचवेळी भाजप नेत्यांनी कॉंग्रेसच्या विरोधात आणि सरकारच्या समर्थनार्थ जोरदार निदर्शने करत सरकारविरोधातील आरोपांचे खंडन केले. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीत दोन्ही पक्षांमध्ये जवळपास तीन तास जुगलबंदी रंगली.

हिंगणा तालुका कॉंग्रेस कमिटी व शेतकऱ्यांच्या नेतृत्वात "भाजप सरकार हाय हाय', "शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे', "शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर ढोंग करणे बंद करा' अशी जोरदार घोषणाबाजी करत आज आंदोलन केले. दोन दिवसांत कर्जमाफी संदर्भात निर्णय घेतला नाही, तर पेटून उठण्याचा इशाराही देण्यात आला. सरसकट कर्जमाफीसह शेतमालाला हमीभाव, कृषिपंपाचे वीजदेयक माफ करावे, मोफत बी-बियाण्यांचा पुरवठा करावा, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना पेन्शन लागू करावी, यासारख्या काही मुख्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

भाजपनेदेखील याच परिसरात सरकारच्या समर्थनार्थ निदर्शने केली व विकासकामांचा पाढा वाचून दाखविला. या निदर्शनांमुळे घटनास्थळी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पोलिसांचीही चांगलीच दमछाक झाली. कुंदा राऊत यांच्या नेतृत्वात कॉंग्रेसने आंदोलन केले. तर जिल्हाध्यक्ष राजीव पोतदार व आमदार समीर मेघे यांच्या नेतृत्वात भाजपने निदर्शने केली.

कर्जमाफीपूर्वीच अभिनंदनाचे फलक
आपला खरा चेहरा जनतेसमोर येईल या भीतीने आंदोलन करण्याची भाजपवर वेळ आली. विकासकामे केली असली, तर आंदोलन करून सांगण्याची गरज पडली नसती, अशी टीका कुंदा राऊत यांनी केली. भाजप आंदोलन करत नसून सरकारची खरी कामे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. खऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, हीच आमची भूमिका आहे, या शब्दांत पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजीव पोतदार यांनी प्रत्युत्तर दिले. दरम्यान, भाजपतर्फे फेटरी येथील चौकात राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याबद्दल अभिनंदनाचे फलक लावले होते. त्यामुळे कर्जमाफी जाहीर होण्यापूर्वीच लागलेल्या या फलकांची परिसरात जोरदार चर्चा होती.
Web Title: nagpur vidarbha news farmer mundan for loanwaiver