जरीपटक्‍यात दोघांवर गोळीबार 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 नोव्हेंबर 2017

नागपूर - जरीपटक्‍यातील रॉयल बारमध्ये दारू पिण्यावरून झालेल्या वादानंतर एका कुख्यात गुंडाने साथीदाराच्या मदतीने दोन युवकांवर गोळीबार केला. दोन्ही युवकांनी पळ काढल्यामुळे ते थोडक्‍यात बचावले. ही घटना शुक्रवारी रात्री एक वाजताच्या सुमारास घडली. यामुळे शहरात पुन्हा गुंडांचे प्रस्थ वाढत असून गुन्हेगारीचा आलेख चढत असल्याचे भासत आहे. 

जरीपटका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार संतोष उर्फ बबलू रामबहादूर यादव (वय ३२, रा. बेजनबाग) हा पेंटिंगची कामे करतो. तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. तो मित्र जानू सुनील कावरे याच्यासोबत शुक्रवारी रात्री अकरा वाजता जरीपटक्‍यातील रॉयल बारमध्ये दारू पित होता.

दरम्यान, आरोपी रवी रतन बोरकर आणि त्याचे साथीदार कांची उर्फ सागर दिलीप खंदारे, मिथून, रूपेश जनबंधू हेसुद्धा दारू पिण्यासाठी आले. बबलूने ‘बार बंद हो रहा है..चलो बाहर निकलो’ असे म्हणत दादागिरी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे रवी बोरकरने बबलूला शिवीगाळ केली. त्यानंतर दोन्ही गटांत बाचाबाची झाली. एकमेकांची कॉलर पकडल्यानंतर बारमधील कर्मचाऱ्यांच्या मदतीने वाद सुटला. रवी बोरकरने बबलूला धमकी दिली आणि निघून गेला. काही वेळात ते चौघेही दोन दुचाकींनी पुन्हा बारसमोर आले. बबलूच्या दिशेने पिस्तुलातून चार गोळ्या झाडल्या. मात्र, अंधारामुळे नेम चुकल्याने बबलू थोडक्‍यात बचावला. त्याने लगेच पोलिसांना फोनवरून माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळावर बुलेट केस जप्त केली. आरोपी रवी बोरकरवर घरफोडी, लुटमार, चोरी अशा स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहे. जानू कावरेही दोन खुनांचे प्रयत्न, मारहाण, चाकूहल्ला असे गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी रवी बोरकर आणि साथीदार कांचन, मिथून, रूपेश यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

Web Title: nagpur vidarbha news firing