गृहलक्ष्मी कन्स्ट्रक्‍शन्सला दणका

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 जून 2017

नागपूर - वेळोवेळी हप्ते भरूनही बांधकाम सुरू न करणाऱ्या गृहलक्ष्मी कन्स्ट्रक्‍शन्सला ग्राहक राज्य आयोगाने दणका दिला. या प्रकरणी ग्राहक आयोगाने ५ लाख रुपये नुकसानभरपाई आणि १ लाख रुपये शारीरिक व मानसिक छळापोटी भरण्याचे आदेश गृहलक्ष्मी कन्स्ट्रक्‍शन्सला दिले आहे. 

नागपूर - वेळोवेळी हप्ते भरूनही बांधकाम सुरू न करणाऱ्या गृहलक्ष्मी कन्स्ट्रक्‍शन्सला ग्राहक राज्य आयोगाने दणका दिला. या प्रकरणी ग्राहक आयोगाने ५ लाख रुपये नुकसानभरपाई आणि १ लाख रुपये शारीरिक व मानसिक छळापोटी भरण्याचे आदेश गृहलक्ष्मी कन्स्ट्रक्‍शन्सला दिले आहे. 

परेश कुकुडकर, मिलिंद करमरकर आणि गट्टू चक्रवर्ती यांनी गृहलक्ष्मी कन्स्ट्रक्‍शन्स व लॅण्ड डेव्हलपर्स यांच्यातर्फे घोषित बेलतरोडी येथील गृहलक्ष्मी पॅलेसमध्ये फ्लॅट खरेदी करण्यासाठी बुकिंग केले. त्यानुसार, त्यांनी ४ लाख रुपये गृहलक्ष्मी कन्स्ट्रक्‍शन्स यांना दिले. यानंतर वेळोवेळी हफ्ते भरूनही बिल्डर व विकासक यांनी बांधकाम सुरू केले नाही. जवळपास तीन वर्षे लोटूनही बांधकाम सुरू न झाल्यामुळे त्यांनी गृहलक्ष्मी कन्स्ट्रक्‍शन्सला वकिलामार्फत नोटीस बजावली. यावर कंपनीतर्फे कुठल्याही प्रकारे उत्तर न प्राप्त झाल्यामुळे राज्य ग्राहक आयोगामध्ये तक्रार नोंदविली. या प्रकरणी बी. ए. शेख आणि जयश्री येंगल यांच्यासमक्ष झालेल्या सुनावणीदरम्यान तक्रारकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. मुख्य म्हणजे सुनावणीदरम्यान गृहलक्ष्मी कन्स्ट्रक्‍शन्सतर्फे कुणीही उपस्थित झाले नाही. यामुळे आयोगाने तीनही तक्रारी मान्य केल्या. या प्रकरणी तक्रारकर्त्यांतर्फे ॲड. अरविंद वाघमारे यांनी कामकाज पाहिले.

बांधकाम पूर्ण करा
आयोगाने आपल्या आदेशामध्ये गृहलक्ष्मी कन्स्ट्रक्‍शन्स व लॅण्ड डेव्हलपर्स यांना तत्काळ बांधकाम पूर्ण करून विक्रीपत्र करण्यास सांगितले. जर बिल्डर बांधकाम करण्यास असमर्थ असेल, तर त्याने तत्काळ पर्यायी व्यवस्था म्हणून परेश कुकुडकर, मिलिंद करमरकर आणि गट्टू चक्रवर्ती यांनी दिलेले ४ लाख रुपये १५ टक्के दरसाल व्याजासह परत करावे. याशिवाय ५ लाख रुपये प्रत्येकी नुकसानभरपाई, शारीरिक व मानसिक छळापोटी १ लाख रुपये भरण्याचे आदेश दिले.

Web Title: nagpur vidarbha news gruhlaxmi construction bump

टॅग्स