हागणदारीमुक्त नागपूर मृगजळच

भांडेवाडी रेल्वे क्रॉसिंग ते बिडगाव मार्गावर उघड्यावर शौचालयासाठी जाताना नागरिक.
भांडेवाडी रेल्वे क्रॉसिंग ते बिडगाव मार्गावर उघड्यावर शौचालयासाठी जाताना नागरिक.

नागपूर - शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी महापालिकेने सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र, शहराच्या अनेक भागांत अद्याप नागरिक उघड्यावर शौचास जात असल्याने हागणदारीमुक्त नागपूर हे एक मृगजळच असल्याचे स्पष्ट होत आहे. पुरेशी सार्वजनिक शौचालये नसल्याने भांडेवाडी परिसरातील अनेक वस्त्यांतील नागरिक परिसरातील उघड्यावरच शौचास जात असल्याचे धक्कादायक वास्तव आज सकाळी दिसून आले. त्यामुळे स्वच्छता सर्वेक्षणात शहराचे मानांकन कसे सुधारणार, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

केंद्रीय शहर विकास मंत्रालयाने डिसेंबरअखेर हागणदारीमुक्त शहरांची यादी मंगळवारी घोषित केली. यात नागपूरचाही समावेश असून, ४९व्या क्रमांकावर आहे. शहराच्या स्वच्छता सर्वेक्षणासाठी केंद्राचे पथक नुकतेच येऊन गेले.

पथकाने शहरातील अनेक भागांत भेट दिली. त्यानंतर नागपूरचा हागणदारीमुक्त शहरांच्या यादीत समावेश करण्यात आला. मात्र, शहरात अद्याप उघड्यावर शौचास जाणे पूर्णपणे बंद झाले नाही. आज सकाळी प्रभाग क्रमांक २६ मधील भांडेवाडी-चांदमारी मार्गावर काही नागरिक उघड्यावर शौचास जाताना आढळून आले. एवढेच नव्हे, तर भांडेवाडी रेल्वे ट्रॅक ते बिडगाव कच्चा मार्गावर लागूनच असलेल्या प्रभाग क्रमांक २५ मधील नागरिक उघड्यावर शौच करीत असल्याचे दिसून आले. भांडेवाडी परिसरातील न्यू सूरजनगरात एक झोपडपट्टी असून, तेथे नागरिकांना अंघोळीसाठी स्नानगृहच नाही तर शौचालय कुठून येणार, अशी स्थिती आहे.

त्यामुळे येथील नागरिकही जवळच असलेल्या मोकळ्या मैदानावर किंवा रेल्वे ट्रॅकवर प्रातःविधीसाठी जात असल्याचे या परिसरातील नागरिकांनी नमूद केले. शहरात अजूनही मोकळे मैदान शौचासाठी वापरले जात असल्याने नागपूर हागणदारीमुक्त कसे, केवळ कागदावर हागणदारीमुक्त शहर घोषित करून कुणाची फसवणूक केली जात आहे, असे अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता सर्वेक्षणाच्या यादीत मानांकनात सुधारणेसाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातूनच शहरात ११ हजार ५०० वैयक्तिक शौचालये तयार केली. एवढेच नव्हे, तर ‘मोबाईल टॉयलेट’ही उपलब्ध करून दिले. परिणामी केंद्रीय शहर विकास मंत्रालयाने हागणदारीमुक्त शहराच्या यादीत नागपूरचा समावेश केला. यातून महापालिकेला १५० गुण मिळतील. स्वच्छता सर्वेक्षणाच्या यादीत नागपूर अग्रक्रमांक गाठेलही; परंतु महापालिकेने हागणदारीमुक्त शहरासाठी केलेले प्रयत्न पुरेसे नसल्याचेच चित्र शहरात दिसून येत आहे. 

सार्वजनिक शौचालये फुल्ल, मग काय करणार? 
भांडेवाडी ते चांदमारी मार्गावर महापालिकेने सार्वजनिक शौचालय बांधून दिले. मात्र, महापालिकेची ही सुविधा पुरेशी नसल्याचे या परिसरात उघड्यावर जात असलेल्या नागरिकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. सकाळी सार्वजनिक शौचालयात गर्दी असते. मग किती वेळ प्रतीक्षा करायची, असा सवाल त्याने उपस्थित केला. या शौचालयामागेच मोठी मोकळी जागा असून, तेथेच नागरिक उघड्यावर जाताना आढळून आले. 

मनपा अधिकारी परतले की पुन्हा सुरू 
उघड्यावर शौचास जाणाऱ्यांवर नियंत्रणासाठी महापालिकेचे अधिकारी वस्तीत येतात. परंतु, ते परत फिरताच किंवा त्यांच्या येण्यापूर्वीच न्यू सूरजनगरातील नागरिक मोकळे होतात किंवा मोकळे होऊन येतात, असे या परिसरातील नागरिकांनी सांगितले. न्यू सूरजनगरमधील दहा ते बारा घरांची झोपडपट्टी असून तेथे त्यांना स्नानगृहही नाही. येथील नागरिक किंवा त्यांची मुले बाजूच्याच मोकळ्या मैदानावर शौचास जात असल्याचे नागरिकांनी नमूद केले.

उघड्यावर शौच नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरूच आहेत. याच प्रयत्नांमुळे केंद्रीय नगरविकास खात्याने नागपूरचा हागणदारीमुक्त शहरांच्या यादीत समावेश केला. मात्र, महापालिकेचे प्रयत्न यापुढेही सुरू राहणार असून एखाद्या भागात शौचालयाची गरज असेल तर तेथील नागरिकांनी शौचालय बांधकामासाठी जागा सुचवावी, महापालिका तेथे शौचालय बांधून देईल. 
- मनोज चाफले, आरोग्य समिती सभापती, महापालिका. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com