व्हॉट्‌सॲपवरून आरोग्याचे प्रशिक्षण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जुलै 2017

आरोग्य व कुटुंबकल्याण प्रशिक्षण संस्थेत अभिनव उपक्रम

आरोग्य व कुटुंबकल्याण प्रशिक्षण संस्थेत अभिनव उपक्रम

नागपूर - दोन वर्षांच्या मुलापासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला मोबाईलचे अक्षरश: वेड लागले आहे. सतत मोबाईलवर व्हॉट्‌सॲप हाताळण्याची सवय साऱ्यांनाच झाली. शालेय मुले, मुली असो की, शासकीय कार्यालयातील कर्मचारी सारे सोशल मीडियाच्या प्रभावाने वेडे झालेत. यातून सार्वजनिक आरोग्याची प्रशिक्षण संस्थाही सुटली नाही. वय वाढल्यानंतर एकतर शिक्षण आणि प्रशिक्षणाची सवय सुटते, अशावेळी हातात वही पेन नको असतो. यातून मार्ग काढण्यासाठी प्राचार्यांनी शक्‍कल लढवली. चक्क व्हॉट्‌सॲप वरूनच व्हिडिओ क्‍लिपिंगच्या माध्यमातून  आरोग्य बाबतचे प्रशिक्षण देण्याचा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. 

राज्य आरोग्य व कुटुंबकल्याण संस्थेचे संचालक डॉ. स्वप्निल लाळे यांनी सूत्रे सांभाळल्यानंतर अनेक अभिनव उपक्रम हाती घेतले. संसर्ग रोगावरील नियंत्रणापासून तर इतरही आरोग्याबाबतच्या संशोधनाचे ज्ञान देण्याचे काम सुरू आहे. दर दिवसाला येथे डॉक्‍टर, परिचारिका, तंत्रज्ञांचे  प्रशिक्षण सुरू असते. परंतु, शिकण्याचे वय संपल्यानंतर प्रशिक्षणादरम्यान अनेकांचे मन लागत नाही. तर अनेकांच्या हाती मोबाईल दिसतो. प्रशिक्षणादरम्यान अनेक कटू अनुभव आल्यामुळे ही शक्कल लढविली. नवीन पद्धतीनुसार पंधरा मिनिटांची व्हिडिओ क्‍लिप तयार करण्यात येते. ही क्‍लिप प्रशिक्षणार्थी वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आरोग्यसेवक तसेच तंत्रज्ञ, हिवताप कर्मचाऱ्यांना एक दिवस आधी पाठविण्यात येते. दुसऱ्या दिवशी ज्यांचे प्रशिक्षण असेल  अशा सर्व प्रशिक्षणार्थींनी पाठवलेल्या व्हिडिओ क्‍लिपवर सामूहिक परिचर्चा घडवून आणली जाते. राज्यभरातील औरंगाबाद, पुणे, नाशिक, अमरावती, ठाणे, कोल्हापूर आणि नागपूर या सातही केंद्रावर हसतखेळत हा उपक्रम सुरू झाला असून याला भरघोस प्रतिसाद मिळत आहे, असे संचालक डॉ. स्वप्निल लाळे म्हणाले.

वयस्क डॉक्‍टर, परिचारिका, औषध निर्माते असो की, आरोग्यसेवक. ठरावीक वय ओलांडल्यानंतर शिक्षण असो वा प्रशिक्षण यात रस नसतो.

प्रशिक्षणादरम्यान अनेकजण मोबाईलवर दिसतात. यामुळे ज्या हेतूने प्रशिक्षण ठेवले तो हेतू साध्य होत नाही. यामुळे व्हॉट्‌सॲपवरून आरोग्य प्रशिक्षणाचा उपक्रम सुरू केला. याशिवाय कागदमुक्त प्रशिक्षण असा दुहेरी हेतू साध्य होतो. अद्ययावत अशा या ज्ञानदानाच्या पद्धतीचा स्वीकार सारे करीत आहेत. 
- डॉ. स्वप्निल लाळे, संचालक, आरोग्य व कुटुंबकल्याण संस्था, नागपूर.

Web Title: nagpur vidarbha news health training on whatsapp