पावसाने उडवला ‘स्मार्ट सिटी’चा फज्जा

नागपूर - रात्रीच्या सुमारास झालेल्या दमदार पावसाने नागरीकांची चांगलीच दमछाक झाली. घरातही पाणी घुसल्याने बालाजीनगरातील कुटुंबाला बेडवर असा आधार घ्यावा लागला.
नागपूर - रात्रीच्या सुमारास झालेल्या दमदार पावसाने नागरीकांची चांगलीच दमछाक झाली. घरातही पाणी घुसल्याने बालाजीनगरातील कुटुंबाला बेडवर असा आधार घ्यावा लागला.

नागपूर - ‘स्मार्ट सिटी’च्या दिशेने दिमाखात वाटचाल करीत असलेल्या उपराजधानीचा तो ‘तोरा’ अवघ्या चार तासांच्या पावसाने धुळीस मिळविला. मेघगर्जना व विजांच्या प्रचंड कडकडाटासह सोमवारी मध्यरात्री आलेल्या मुसळधार पावसाने ‘स्मार्ट सिटी’ची अक्षरशः दाणादाण उडविली. सत्ताधारी भाजपाच्या कार्यालयासह शेकडो वस्त्यांतील घरांत पाणी शिरल्याने असंख्य नागरिकांना रात्रभर बादल्या घेऊन पाणी घराबाहेर फेकण्याची कसरत करावी लागली. अवघ्या चार तासांत तब्बल १३५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून हवामान विभागाने आणखी दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

सोमवारी दिवसभर संततधारेनंतर रात्री अकराच्या सुमारास पावसाने गिअर बदलले. मध्यरात्री बारानंतर वरुणराजाने उग्र रूप धारण केले. मेघगर्जना व कानठळ्या बसविणाऱ्या विजांच्या प्रचंड कडकडाटांसह मुसळधार पावसाने तीन तास उपराजधानीला चांगलेच झोपडून काढले. विजांचा लखलखाट हृदयात धडकी भरविणारा होता. विजांमुळे सुदैवाने कोणतीही जीवहानी झाली नसली तरी, घरांमध्ये पाणी शिरल्याने अनेकांच्या धान्याची नासाडी झाली. अनेकांच्या टीव्ही, पंखे, कुलरमध्येही पाणी शिरल्याने आर्थिक नुकसान झाले. रात्री अकराला सुरू झालेला पाऊस पहाटे तीनलाच थांबला.

यंदाच्या पावसाळ्यात नागपूरकरांनी पहिल्यांदाच वरुणराजाचे एवढे उग्र रूप पाहिले व अनुभवले हे विशेष. धो-धो पावसामुळे अख्खे शहर पाणी पाणी झाले होते. शहरातील नागनदी, पिवळी नदीसह नाले तुडुंब भरून वाहू लागल्याने सिवेज लाइनमधील पाणीही परत घरांत शिरले. बहुमजली इमारतींच्या बेसमेंटमध्ये पाणी साचले. नदी, नाल्याच्या बाजूच्या वस्त्यांमधील घरांत पाणी शिरले. 

टीव्ही, पंखे जळाले
अख्खे शहर जलमय 
अनेकांनी जागून काढली रात्र
ऐन मध्यरात्री विजांचे प्रचंड तांडव
भाजपच्या कार्यालयात चार फूट पाणी
खोलगट भागांत सर्वत्र पाणीच पाणी
चार तासांत तब्बल १३५ मिलिमीटर 
चौक बनले तलाव, शेकडो घरे पाण्यात
बहुमजली इमारतींच्या बेसमेंटमध्येही पाणी

वनविभागात गळती
मध्यरात्री शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे सिव्हिल लाइन्समधील शून्य मैलाजवळील मुख्य वनसंरक्षकांच्या कार्यालयातील छताला गळती लागली. यामुळे सकाळी कर्मचारी आले, तेव्हा कार्यालयातील प्रवेशद्वाराजवळच पाणीच पाणी होते. या कार्यालयाच्या नूतनीकरणासाठी शासनाने निधी मंजूर आहे. मात्र, अद्याप कार्यालय हलविण्याचा निर्णय प्रलंबित असल्याने पावसाळ्यात कर्मचाऱ्यांना गळक्‍या कार्यालयातच काम करण्याची वेळ आली आहे. गळत असलेल्या ठिकाणी पाणी जमा करण्यासाठी मोठ्या स्टीलच्या बादल्या ठेवण्यात आलेल्या आहेत.

मायनर ओटी बंद
मध्यरात्री मुसळधार पावसाचा तडाखा मेडिकलला बसला. शस्त्रक्रियागार, औषधालय, मेडिसीन आणि सर्जरी कॅज्युअल्टीमध्ये पाणी शिरले. येथील मायनर ओटीमध्ये सुरू असलेल्या सर्व शस्त्रक्रिया थांबल्या. मायनर ओटी बंद करावी लागली. याशिवाय विविध वॉर्ड, मध्यवर्ती प्रयोगशाळेत पाणी शिरल्याने मंगळवारी दुपारपर्यंत तपासण्या खोळंबल्या. 

भाजप कार्यालयात चार फूट पाणी
पावसाचा फटका सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या गणेशपेठ येथील कार्यालयालाही बसला. मुसळधार पावसामुळे कार्यालयात चार फूट पाणी भरले होते. अनेकांच्या चारचाकीही पाण्याखाली आल्या होत्या. छापरूनगरातही एका अपार्टमेंटच्या बेसमेंटमध्ये पाणी साचल्याने चारचाकी वाहने पाण्यात दिसून आली. 

बळीराजा सुखावला
पावसाने शहर धुऊन काढले असले तरी, जिल्ह्यात इतरही ठिकाणी दमदार पाऊस कोसळल्याचे वृत्त आहे. जवळपास तीन आठवड्यांनंतर वरुणराजाने कृपा केल्याने बळीराजा चांगलाच सुखावला आहे. दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे उर्वरित पेरण्यांना वेग येणार आहे.  

आणखी दोन दिवस मुसळधार
हवामान विभागाने रात्री साडेआठ ते सकाळी साडेआठपर्यंत शहरात एकूण १३५ मिलिमीटर पावसाची नोंद केली. यातील बहुतांश पाऊस रात्री अकरा ते तीन या चार तासांतीलच होता. नागपूर वेधशाळेने विदर्भात आणखी दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. 

नगरसेवकांना घेराव 
रोडवरील बालाजीनगरातील नाल्याला संरक्षक भिंत नसल्याने घरांत पाणी शिरले. सकाळी नगरसेवक मनोज गावंडे आढावा घेण्यासाठी आले. संतप्त नागरिकांनी त्यांचा घेराव केल्याचे नागरिक प्रशांत चिखलकर यांनी सांगितले. नाल्याला संरक्षक भिंत बांधण्याची मागणी येथील नागरिकांनी केली.

झाडेही पडली 
वादळासह आलेल्या पावसामुळे शहरांत झाडेही पडली. रामदासपेठ येथील कल्पना बिल्डिंगच्या प्रवेशद्वाराजवळ झाड कोसळले. वर्दळीचा रस्ता असल्याने सकाळपर्यंत झाड हलविण्यात आले. मनीषनगरात नवोदय बॅंकेजवळही झाड पडले. अनेक भागांतून झाडे पडल्याच्या तक्रारी होत्या. 

गोधनीत टीव्ही व पंखे निकामी
पावसाच्या वेळी वीज कडाडल्याने गोधनी परिसरातील राजेश्‍वरनगर, प्रकाशनगर व अन्य ले-आउट्‌समधील असंख्य नागरिकांच्या घरचे टीव्ही, सेट टॉप बॉक्‍स, पंखे, फ्रीज, कुलर्स व अन्य इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू जळाल्या तसेच निकामी झाल्याने त्यांना चांगलाच फटका बसला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com