पावसाची दमदार ‘बॅटिंग’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जुलै 2017

नागपूर - सोमवारच्या मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने जबर दणका दिल्यानंतर मंगळवारीही रात्रभर पावसाने दमदार ‘बॅटिंग’ करून नागपूरकरांची परीक्षा घेतली. लागोपाठ दोन दिवसांच्या पावसामुळे सर्वसामान्यांसह शेतकरी वर्ग आनंदात असला तरी, शहरी भागातील नागरिकांना मात्र अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हवामान विभागाने पुन्हा दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिल्यामुळे त्यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे. 

मध्य भारतावर कमी दाबाच्या पट्ट्याचा तीव्र प्रभाव असल्यामुळे सध्या विदर्भात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे. नागपुरातही गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाचा जोर वाढलाय. सोमवारच्या रात्री वरुणराजाने तांडव केल्यानंतर मंगळवारीदेखील रात्रभर विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह संततधार पाऊस बरसला. रात्री अकराच्या सुमारास सुरू झालेला पाऊस पहाटेपर्यंत सुरू होता. पावसामुळे एकीकडे बळीराजा आनंदात असला तरी, शहरवासींना मात्र फटका बसतो आहे. 

विशेषतः खोलगट भागांमध्ये राहणाऱ्या शेकडो नागरिकांना पाण्यात दिवस काढावे लागत आहेत. अनेक वस्त्या व घरांमध्ये अजूनही पाणी साचले आहे.  
नागपूर वेधशाळेने शहरात सकाळी साडेआठपर्यंत २४.७ मिमी पावसाची नोंद केली. कालही यंदाच्या पावसाळ्यातील सर्वाधिक १३५ मिमी पाऊस झाला होता. नागपुरात केवळ दोनच दिवसांत १६० मिलिमीटरच्या वर पाऊस बरसला. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास लवकरच नागपूर जिल्हा तसेच विदर्भात पावसाची सरासरी भरून निघण्याची शक्‍यता आहे. 

ब्रह्मपुरीत अतिवृष्टी
विदर्भात पावसाचा सर्वाधिक फटका ब्रह्मपुरवासींना बसला. येथे चोवीस तासांत तब्बल २०७ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. या शिवाय चंद्रपूर (९६ मिलिमीटर), वर्धा (६५ मिलिमीटर), यवतमाळ (२८.४ मिलिमीटर) आणि अमरावती (१८.२ मिलिमीटर) येथेही पावसाने जोरदार हजेरी लावली.

Web Title: nagpur vidarbha news heavy rain in nagpur