विदर्भात वादळासह गारांचा पाऊस

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 जून 2017

वीज पडून दोन तरुण ठार - एक गंभीर

वीज पडून दोन तरुण ठार - एक गंभीर
नागपूर - विदर्भात काही ठिकाणी आज, सोमवारी दुपारनंतर वादळासह पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली. चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांत वीज पडून प्रत्येकी एक युवक ठार, तर दोघे जण जखमी झाले. तसेच विविध ठिकाणी 19 जनावरेही ठार झालीत. भंडारा जिल्ह्यात काही वेळ गारांचा वर्षाव झाला. हवामान खात्याने उद्या, मंगळवारी विदर्भात काही ठिकाणी वादळी वारे तसेच मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्‍यता वर्तविली आहे.

भंडारा जिल्ह्यातील लाखनीत दुपारी साडेबाराच्या सुमारास अचानक वादळाला सुरुवात झाली. अनेक चहाटपऱ्या तसेच दुकानांवरील टिनपत्रे उडून गेले. त्यानंतर गारांसह पावसाला सुरुवात झाली. वादळ आणि तुफानी गारांमुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प होती.

चंद्रपूर तालुक्‍यातील वेंडली येथे सकाळी 10 वाजता वीज पडून प्रशांत सोमा आमटे (वय 17) या युवकाचा मृत्यू झाला. तर, त्याचे वडील सोमा आमटे गंभीर जखमी झाले. दोघेही शेतात काम करीत होते. जखमी सोमा आमटे यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रविवारी रात्री जिल्ह्यातील अनेक भागांत वादळासह मुसळधार पाऊस पडला. राजुरा तालुक्‍यातील सिंधी येथे शेतालगत वीजतारा कोसळून पडल्या होत्या. आज याच भागातून शेतकरी जनावरे घेऊन जात असताना वीजतारांचा स्पर्श झाल्याने नऊ जनावरे जागीच ठार झाली.

यवतमाळ जिल्ह्यातील शिबला (ता. झरी) येथील सुधीर इंद्रदेव मरापे (वय 18) या युवकाचा वीज कोसळल्याने मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी बाराच्या सुमारास रामपूर शिवारात घडली. सुधीर स्वत:च्या शेतीची कामे आटोपून मामाकडे शेतीकामासाठी आला होता. आज दुपारी वादळवाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. शेतात काम करीत असताना सुधीरच्या अंगावर वीज कोसळली. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ पांढरकवडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्‍टरांनी त्याला मृत घोषित केले.

नागपूर जिल्ह्यात सोमवारी दुपारी 4 च्या सुमारास जोरदार वादळ सुटले. त्यानंतर मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. मौदा तालुक्‍यातील अरोली येथे बोराएवढ्या गारा पडल्या. धर्मापुरी येथे वादळामुळे विजेचे खांब कोसळले. कोराड येथे वीज पडून तीन जनावरे ठार झालीत. काटोल तालुक्‍यात शेकडो गावांना वादळाचा फटका बसला. संत्रापिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कोंढाळी परिसरात सुमारे पंधरा गावांना मुसळधार पावसाने झोडपले. रामटेक, पारशिवनी, उमरेड तालुक्‍यात अर्धा तास जोरदार पाऊस झाला.

अमरावती जिल्ह्यातील काकडा परिसराला आज दुपारी वादळवाऱ्यासह पावसाने झोडपले. वादळामुळे मोठमोठी झाडे उन्मळून पडली. त्यामुळे काकडा-अंजनगाव मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. वीजतारा व खांब तुटल्याने परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता.

गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्‍यातील बोलेपल्ली येथील पोलिस मदत केंद्रावरील टिनाचे छत उडाले. त्यामुळे पोलिस जवानांना तंबू उभारून राहावे लागले. गोमणीजवळ एक झाड कोसळले. त्यामुळे तीन तास वाहतूक ठप्प होती. तसेच वीजखांब वाकल्याने वीजपुरवठा खंडित झाला. एटापल्ली तालुक्‍यात कृष्णार येथे गावाबाहेर चरण्यास गेलेले चार बैल वीज कोसळून मृत्युमुखी पडले. ही घटना सकाळी साडेसातच्या सुमारास घडली.

वर्ध्यात दहा गावांना तडाखा
वादळी पावसामुळे वर्धा जिल्ह्यातील दहा गावांना जोरदार तडाखा बसला. समुद्रपूर तालुक्‍यात कित्येक घरांवरील छत उडाले. शेगाव (गो.), परडा, बोथली गावात वीज पडून चार बैल ठार झाले. पवनार येथील कुंदन कळणे यांचे विटा-मातीचे घर कोसळले. मारुती कांबळे यांच्या घरावरील टिन तर गणेश रामाजी मसराम यांच्या घरावरील कवेलू उडाल्याने पाणी शिरून अन्नधान्याची नासाडी झाली. सेलू तालुक्‍यातील कान्हापूर परिसरात विजेचे 25 खांब कोसळले. सेवाग्राम परिसरातील करंजी (भोगे) येथील छाया दामोदर तिमांडे या अंगावर घराचे टिन कोसळल्याने जखमी झाल्या. शेतशिवारातील 20 पेक्षा अधिक झाडे उन्मळून पडली.

Web Title: nagpur vidarbha news heavy rain in vidarbha