महामार्ग की मृत्युमार्ग?

महामार्ग की मृत्युमार्ग?

नागपूर - गेल्या नऊ महिन्यात नागपूर महामार्ग पोलिस प्रादेशिक विभागाअंतर्गत येणाऱ्या रस्त्यांवरील अपघातात ८३२ जणांचा बळी गेला. महामार्गावर दररोज सरासरी तिघांचा बळी जात आहे. महामार्गावरील दारू दुकाने, बार बंद केल्याने अपघातांच्या संख्येत घट होण्याचा राज्य शासनाचा दावाही फोल ठरला असून, दररोज सहा अपघात होत असल्याचे आकडेवारीनेच स्पष्ट केले आहे. विदर्भातील नागपूर-चंद्रपूर हा मार्ग तर मृत्यूचा सापळाच ठरला असून, येथे नऊ महिन्यात १३९ जणांचा बळी गेला. 

महामार्गांवरील अपघातांच्या संख्येत घट करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणापासून तर राज्य शासनानेही अनेक महत्त्वाचे निर्णय घेत अंमलबजावणी केली. परंतु, नागपूर महामार्ग पोलिस प्रादेशिक विभागाने जानेवारी ते सप्टेंबरपर्यंत १४४१ अपघातात ८३२ जण ठार झाल्याची माहिती माहिती अधिकारात दिली अन्‌ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच राज्य शासनाच्या निर्णयाला सुरुंग लागल्याचे दिसून येत आहे. नागपूर महामार्ग प्रादेशिक विभागांतर्गत नागपूर- खवासा, नागपूर- देवरी, नागपूर- मलकापूर, नागपूर-नांदेड, नागपूर-पिंपळखुटी, नागपूर- राजुरा, नागपूर- जिंतूर असे २००३ किलोमीटरचे रस्ते येतात. आरटीआय कार्यकर्ते अभय कोलारकर यांना दिलेल्या माहिती अधिकारातील माहितीनुसार, गेल्या नऊ महिन्यांतील अपघातांत १०१५ नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे महामार्गावर वाहनचालक दारू पिऊन वाहने चालवीत असल्याने अपघात होत असल्याचा निष्कर्ष काढत राज्य शासनाने अपघातांची संख्या कमी करण्यासाठी महामार्गांवरील बार आणि दारूची दुकाने बंद केली. परंतु गेल्या नऊ महिन्यांत ३५१ अपघात ट्रकने झाले असून, १५१ अपघात कारने झाले आहेत. याशिवाय ५७ बस अपघात झाले. या आकडेवारीने राज्य शासनाच्या निर्णयाचाही काहीही परिणाम झाल्याचे दिसून येत नाही. उलट वेग आणि सीटबिल्ट न बांधल्याने अपघातातील मृत्यूंची संख्या चिंताजनक आहे. मात्र, याबाबत करण्यात येत असलेली जनजागृतीही परिणामकारक नसल्याचेच या आकडेवारीने स्पष्ट केले आहे. 

विदर्भातील रस्त्यांवर दररोज एक बळी 
विदर्भातील नागपूर-अमरावती, नागपूर-चंद्रपूर, नागपूर- यवतमाळ, नागपूर- अकोला या मार्गांवर २४५ जण अपघातात ठार झाले. यात नागपूर-चंद्रपूर मार्ग मृत्यूचा सापळा ठरला. येथे सर्वाधिक २५६ अपघातांत १३९ बळी गेलेत. जामपर्यंतच्या मार्गावर २४ अपघातांत २१ बळी गेले. नागपूर - यवतमाळ मार्गावर २५ अपघातांत २५, नागपूर- अकोला मार्गावर ९३ अपघातांत ४२ जणांना प्राण गमवावा लागला. विदर्भातील या रस्त्यांवर दररोज एक अपघातबळी ठरत आहे. 

धोरणावर भर, कृतीबाबत उदासीनता 
संयुक्त राष्ट्रसंघाने २०११ ते २०२० हे दशक रस्ता सुरक्षेसाठी ठोस कृती करण्याचे दशक म्हणून घोषित केले आहे. परंतु, देशात या दिशेने अद्याप ठोस कृती झालेली नसल्याचे दिसून येत आहे. केवळ अपघातांतील मृतांची आकडेवारी गेल्या वर्षीपेक्षा कशी कमी झाली, यातच धन्यता मानण्यात राज्य व केंद्र शासन मश्‍गूल आहेत. रस्ते सुरक्षा सप्ताह-पंधरवडे साजरे केले जाते. मात्र, सुरक्षेचे नियम पाळण्याकडे नागरिकांचाही कल नसल्याचेच या आकडेवारीने स्पष्ट केले.

टोल वसुली जोमात, रस्ते दुरुस्ती कोमात 
वाहनधारकांकडून हजारो कोटींचा टोल वसूल करून ठेकेदारांनी आणि बड्या कंपन्यांनी आपले उखळ पांढरे करून घेतले. सरकारने काही मार्गांवरची टोल वसुली बंद केली. मात्र, बहुतांश भागात ती सुरू आहे. वाहनधारकांकडून प्रचंड टोल वसूल करायचा. पण, रस्त्यांची देखभाल आणि डागडुजीकडे कंत्राटदार व बड्या कंपन्यांनी दुर्लक्ष केल्याने अपघात होत असल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यामुळेच देशातील रस्त्यांवर होणाऱ्या एकूण अपघातांपैकी १४ टक्के अपघात महाराष्ट्रात होत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com