बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी, दहावीची १ मार्चपासून होणार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

नागपूर - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक सोमवारी जाहीर करण्यात आले. त्यानुसार पुढील वर्षी २१ फेब्रुवारी ते २० मार्च या कालावधीत बारावीची परीक्षा होईल.

नागपूर - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक सोमवारी जाहीर करण्यात आले. त्यानुसार पुढील वर्षी २१ फेब्रुवारी ते २० मार्च या कालावधीत बारावीची परीक्षा होईल.

दहावीच्या परीक्षेसाठी १ मार्च ते २४ मार्च हा कालावधी निश्‍चित करण्यात आला आहे. राज्य शिक्षण मंडळाकडून अद्याप याबाबत अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.  यामुळे शिक्षण मंडळाकडून परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक कधी जाहीर केले जाणार, याकडे आता विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे. दरवर्षी लाखो विद्यार्थी ही परीक्षा देतात. संभाव्य वेळापत्रकानुसार दहावीच्या परीक्षेसाठी आता १६३ दिवस म्हणजे जवळपास पाच महिने शिल्लक आहेत. तर, बारावीच्या परीक्षेसाठी जवळपास १५५ दिवस शिल्लक आहेत.

विद्यार्थ्यांना अभ्यासाचे आगाऊ नियोजन करता यावे, यासाठी गेल्या काही वर्षांपासून जुलै किंवा ऑगस्टमध्येच दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येत आहे. परंतु, गेल्यावर्षी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे  वेळापत्रक जाहीर करण्यास उशीर झाला होता. त्यावेळी प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षांमध्ये अडसर  येत असतानाच प्रवेशपत्रांमध्ये चुका असल्याची बाब समोर आली होती. विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रांमध्ये, विषयांमध्ये तर उत्तर लिहिण्याच्या माध्यमातही चुका असल्याचे समोर आल्याने गोंधळ उडाला होता. यामुळे प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी शिक्षकांकडून करण्यात आली होती. मात्र, राज्य शिक्षण मंडळाने नियोजित वेळापत्रकाप्रमाणेच परीक्षा घेतल्या होत्या.

Web Title: nagpur vidarbha news HSC exam & SSC Exam