दक्षिण नागपुरात काविळीचे थैमान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

३० च्या वर रुग्ण - महानगरपालिका प्रशासन सुस्त, नागरिकांमध्ये भीती
नागपूर - डेंगी, स्वाइन फ्लूपासून तर गॅस्ट्रोच्या साथीने नागपूर बेजार झाले. त्यात पुन्हा काविळीची लागणही वेगात पसरत आहे. दक्षिण नागपुरातील बॅंक कॉलनी, भगवाननगर, चंद्रनगर, नालंदानगर परिसरात काविळीची साथ पसरली असून, ३०च्या वर व्यक्तींना लागण झाली आहे. यामुळे या भागात खळबळ उडाली आहे. मात्र, अद्याप महापालिका प्रशासन सुस्त आहे. एकाही अधिकाऱ्याने भेट दिली नसल्याची ओरड या भागातील नागरिकांनी केली आहे. 

धंतोली झोनमध्ये येणाऱ्या हावरापेठ, भगवानगर, बॅंक कॉलनी, चंद्रनगर, न्यू कैलासनगर या भागांतील खासगी रुग्णालये ‘हाउसफुल्ल’ आहेत. यातील काहींनी मेडिकलमध्ये उपचार केले असून, त्यांना कावीळ झाल्याची नोंद आहे. सरस्वती आगलावे, नयन कांबळे, पंकज ठाकूर, चैताली चौधरी, ज्योती चौधरी, जिजा पवार, अमित लोहकरे, अंकित तायडे, मंगेश धुरंधर, शीला चौरे, गीता येरकर, विशाल जाधव, अंकुर सोनी, तन्वीर सोनी, कृतिका झोड, श्रेयस कडू, सरस्वती आगलावे, अनिकेत देवतळे, उषा सोनी, नम्रता लोहकरे यांच्यासह अनेकांना काविळ असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मनीष चांदेकर यांनी या भागात काविळीची साथ पसरल्याने नगरसेविका वंदना भगत यांनाही सूचना दिली. रविवारी नगरसेवक मनोज गावंडे यांनी या भागातील नागरिकांची भेट घेतली.  

आरोग्य अधिकारी सुस्त 
धंतोली झोनअंतर्गत येणाऱ्या वस्त्यांमध्ये काविळीची साथ पसरूनही महापालिकेचे आरोग्य अधिकाऱ्यांनी या भागात भेट दिली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. या भागातील पाण्याचे नमुने अद्याप घेतलेले नसल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते मनीष चांदेकर यांनी केली.  

दूषित पाण्यातून कावीळ आणि गॅस्ट्रोची लागण होते. ही लागण रोखण्यासाठी पाणी उकळल्यानंतर थंड करून प्यावे. तेल, तूप, लोणी, साय यांसारखे पदार्थ आहारातून टाळावे. कोंडा असलेला तांदूळ वापरावा, हिरव्या पालेभाज्या, ताजी फळे खावी. लिंबाचा रस घातलेले पाणी दिवसभर प्यावे.
- डॉ. एम. एम. बोरकर, ज्येष्ठ संसर्गरोगतज्ज्ञ, नागपूर.

नळाला गटाराचे पाणी 
येथील न्यू बाभुळखेडा परिसरात नळाच्या पाइपलाइनमध्ये गटाराचे पाणी येत आहे. नळाच्या पाण्याला उग्र वास तसेच पिवळसर रंग असल्याने नगरसेवकांकडे तक्रार करण्यात आली. नगरसेवक मनोज गावंडे यांनी दुपारी या भागात भेट दिली. तक्रारी ऐकून घेतल्या.  

Web Title: nagpur vidarbha news Jaundice ssickness