महानाट्यातून अवतरले कृष्णयुग

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 जून 2017

नागपूर - आठ मंच मिळून बनविलेला भव्य रंगमंच. त्यावर उभारलेला दुमजली सेट, घोडे, उंट, गाईगुरे, रथ यांचा प्रत्यक्ष रंगमंचावर प्रवेश. कृष्णयुगातील दहीहंडीपासून ते कालियामर्दन, कंसवध अशा एकाहून एक थक्क करणाऱ्या प्रसंगांवर आधारित ‘श्रीकृष्णा’ या महानाट्याद्वारे रविवारी (ता. चार) अक्षरश: कृष्णयुग अवतरल्याची अनुभूती नागपूरकर रसिकांन घेतली.

रेशीमबाग मैदानावर माहेश्‍वरी पंचायततर्फे ‘श्रीकृष्णा’ या महानाट्याचा प्रयोग झाला. उद्‌घाटन आमदार गिरीश व्यास, माहेश्‍वरी पंचायतचे अध्यक्ष नवनीत माहेश्‍वरी, प्रकाश सोनी व डॉ. राजेंद्र चांडक यांच्या हस्ते झाले. भव्यता आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख मिलाफ साधत खुल्या व्यासपीठावर सादर होणारे ‘श्रीकृष्णा’ हे कृष्णजीवनावर आधारित हिंदी भाषेतील पहिलेच भव्य महानाट्य ठरले आहे.

फिरत्या, सरकत्या आणि उचलत्या अशा तीन वेगवेगळ्या स्वरूपांत केलेली रचना हे या महानाट्याचे वैशिष्ट्य आहे. किरण मेश्राम लिखित आणि सुरेश मेश्राम निर्मित महानाट्यामध्ये २५० कलाकारांनी भूमिका साकारून रसिकांचे मन जिंकले. त्याचप्रमाणे महानाट्यात मनोरंजन करण्यासाठी ८० स्त्री-पुरुष नर्तक कलाकारांचा समावेश आहे. पूर्णाकृती भव्य श्रीकृष्ण प्रतिमा हेदेखील या महानाट्याचे वैशिष्ट्य ठरले. महानाट्यातील गीतांना सुरेश वाडकर, प्रसेनजित कोसंबी या गायकांनी आवाज दिला आहे. भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातील प्रसंग मनोरंजनाच्या माध्यमातून दाखविण्यासाठी या महानाट्याची निर्मिती केल्याचे संयोजकांनी सांगितले. 

प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नेत्रदीपक प्रकाशयोजना, अंगावर शहारे आणणारे प्रसंग, समर्पक संवाद आणि आतषबाजीमुळे महानाट्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दहीहंडी, कालिया मर्दन, रासलीला, पुतना मावशीचा वध, कंसवध, रुक्‍मिणीहरण, द्वारकानिर्माण असे श्रीकृष्णयुगातील महत्त्वाचे प्रसंग लीलया साकारण्यात आले.

Web Title: nagpur vidarbha news krishnayug in mahanatya