कविवर्य ग्रेस यांच्या नामफलकावर ‘टू लेट’चे पत्रक!

कविवर्य ग्रेस यांच्या नामफलकावर ‘टू लेट’चे पत्रक!

महापालिकेचे दुर्लक्ष - प्रतिभावंतांच्या अवहेलनेचे हे कसले धोरण?

नागपूर - नागपूरचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे वैभव असलेले कविवर्य ग्रेस यांच्या धंतोलीतील निवासस्थानापुढे उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या नामफलकावर आता ‘टू लेट’ची पत्रके झळकू लागली आहेत. गेल्या अनेक दिवसांमध्ये महानगरपालिकेला या फलकाच्या उद्‌घाटनाचा मुहूर्त तर सापडलेला नाहीच, मात्र आता त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. प्रतिभावंतांच्या अवहेलनेचा हा धक्कादायक प्रकार असल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.

नागपूर शहराचे वैभव वाढविणाऱ्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या स्मृती दीर्घकाळ कायम राहाव्यात, या उद्देशाने त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणी नामफलकाची योजना नागपूर महानगरपालिकेने अमलात आणली. या माध्यमातून जनरल मंचरशा आवारी, डॉ. केशव बळीराम हेडगेवार, प्राचार्य डॉ. राम शेवाळकर, पुरुषोत्तम दारव्हेकर आदींची नामफलके लागली आणि त्यांचे उद्‌घाटनही झाले. मात्र, ग्रेस यांच्या धंतोलीतील घरापुढे लागलेल्या फलकाला अनावरणाचा मुहूर्तच गवसत नाहीये. कवीवर्य ग्रेस यांचे निधन होऊन यंदा २६ मार्चला पाच वर्षे पूर्ण झाली. त्या दिवशी महानगरपालिका फलकाचे उद्‌घाटन करेल, असे अपेक्षित होते, मात्र तसे झाले नाही. त्यानंतर १० मे रोजी ग्रेस यांच्या वाढदिवशीही प्रशासनाला जाग आली नाही.

यासंदर्भात काही महिन्यांपूर्वी महानगरपालिकेच्या एका पदाधिकाऱ्याशी संपर्क साधला असता, ‘ग्रेस यांच्या कुटुंबीयांची वेळ मिळत नसल्यामुळे उद्‌घाटन रखडले आहे’ असे सांगण्यात आले. त्यालाही चार महिन्यांचा कालावधी लोटला. यासंदर्भात पाठपुरावा सातत्याने होतोय की नाही, याबाबतही अनिश्‍चितता आहे. कुठल्याही सरकारी मालमत्तेवर ‘टू लेट’चे पत्रक चिटकविणे चुकीचेच आहे. मात्र, अनेक दिवस एखादी वस्तू धूळखात पडली असेल तर समाजातील विकृत वृत्ती त्याचा असाच उपयोग करतात, हे सर्वांना ठाऊक आहे. धंतोलीत अनेक दिवसांपासून उभा असलेला हा फलक कुणाच्या नावाचा आहे आणि कुणी लावला आहे, हे प्रत्येकाला माहिती असणे शक्‍यच नाही. त्यावर फलकाचा श्‍वास मोकळा करून देणे हा एकमेव पर्याय आहे. ग्रेस यांच्या दारावरील वैशिष्ट्यपूर्ण पाट्या संपूर्ण साहित्य विश्‍वात चर्चेचा विषय होता आणि आजही आहे. मात्र, ग्रेसांच्याच नामफलकावर अशा ‘पाट्यांनी’ घर करावे, हे दुर्दैवी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com