बिबट, अस्वल सफारीचे प्रस्ताव कागदावरच

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 एप्रिल 2018

नागपूर - विदर्भात वन्यजीव पर्यटन विकासाला चांगली संधी असून सध्या वाघालाच लक्ष्य केंद्रित करून पर्यटनावर भर दिला जात आहे. यासोबत राज्यात बिबट, अस्वल सफारी विकसित होऊ शकते, तसा प्रस्तावही तयार आहे. मात्र, अद्यापही तो कागदावरच असून त्याची अंमलबजावणी न झाल्याची खंत प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) श्रीभगवान यांनी सेवानिवृत्तीच्या पूर्वसंध्येला येथे व्यक्त केली. 

नागपूर - विदर्भात वन्यजीव पर्यटन विकासाला चांगली संधी असून सध्या वाघालाच लक्ष्य केंद्रित करून पर्यटनावर भर दिला जात आहे. यासोबत राज्यात बिबट, अस्वल सफारी विकसित होऊ शकते, तसा प्रस्तावही तयार आहे. मात्र, अद्यापही तो कागदावरच असून त्याची अंमलबजावणी न झाल्याची खंत प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) श्रीभगवान यांनी सेवानिवृत्तीच्या पूर्वसंध्येला येथे व्यक्त केली. 

नागपूर श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते आज बोलत होते. यावेळी नवनियुक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक उमेशकुमार अग्रवाल उपस्थित होते. ते म्हणाले, ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पात सर्वाधिक पर्यटन वाढले. तसेच पर्यटन बोर, नवेगाव-नागझिरा, टिपेश्‍वर पेंच व्याघ्र प्रकल्पातही वाढू शकते. या प्रकल्पातही मोठ्या प्रमाणात वन्यजिवांचे अस्तित्व असून जैवविविधता आहे. मात्र, अद्यापही पर्यटक याकडे वळलेला नाही. माझ्या कारकिर्दीत हे काम अपूर्ण राहिल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

कळमेश्‍वर वनपरिक्षेत्रातील निमजी हे गाव मानव-वन्यजीव यांच्यातील सहजीवनाचे उत्तम उदाहरण म्हणून पुढे आले आहे. त्या धर्तीवर इतरही ठिकाणी मानव व वन्यजीव एकत्रित नांदतील, असे प्रयत्न करणे अपेक्षित आहे. 

वन कर्मचारी अनेक वर्ष विभागात सेवा देतात. त्यांची सेवानिवृत्तीचे वेतन रखडलेले असल्याची अनेक उदाहरणे पुढे आली आहेत. सेवानिवृत्ती वेतन ही सबसिडी नाही तर तो त्यांचा अधिकार आहे असे न्यायालयाने म्हटले असतानाही त्यांना सेवानिवृत्ती वेतनासाठी पायपीट करावी लागते. अशा कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो पूर्णपणे सुटलेला नसल्याचे सांगितले.   

नागपूर येथे १७ वर्षे काम केले. अनुभव चांगला होता. आजपासूनच महाराष्ट्र प्रशासकीय लवाद (मॅट) मध्ये रुजू होत असल्याचे सांगून आता आपल्या संवादावर बंधने येणार असल्याचेही त्यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात सांगितले. बोरीवली राष्ट्रीय उद्यानात गेल्या तीन वर्षांत एकाही वन्यजिवाने मानवावर हल्ला केल्याची घटना पुढे आलेली नाही. त्याच धर्तीवर भविष्यात गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाच्या शेजारी मानव व वन्यजीव संघर्ष वाढल्यास त्यावर निर्बंध लावण्यात येतील, असे नवनियुक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक उमेशकुमार अग्रवाल यांनी सांगितले. जंगलाला लागणाऱ्या आगीवर निर्बंध लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही समाजविघातक व्यक्ती जंगलाला आग लावत असल्याचे त्यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात सांगितले.

Web Title: nagpur vidarbha news leopard bear tourist proposal