शेतकऱ्यांना कर्जमाफी शक्‍य नाही - गडकरी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 मे 2017

नागपूर - सध्याच्या स्थितीमध्ये शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करणे शक्‍य नसल्याचे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी आज केले.

नागपूर - सध्याच्या स्थितीमध्ये शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करणे शक्‍य नसल्याचे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी आज केले.

पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना गडकरी यांनी कर्जमाफीने शेतकऱ्यांचे प्रश्‍न सुटत नसल्याचे सांगितले. गेल्या काही महिन्यांपासून विरोधकांतर्फे शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, अशी मागणी होत आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे महाराष्ट्रात संघर्ष यात्रा काढण्यात आली. भाजपचे सहयोगी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी आत्मक्‍लेश यात्रा सुरू केली आहे. ते राजभवनावर जाणार आहेत. यावर बोलताना गडकरी म्हणाले, ""विरोधात असताना आम्हीही कर्जमाफीची मागणी करीत होतो. यापूर्वी कॉंग्रेस सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफीही केली आहे.'' परंतु यातून प्रश्‍न सुटले नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील, तर सिंचन क्षमता वाढविण्याची गरज आहे. विदर्भातील सिंचन क्षमता 50 टक्‍क्‍यांपर्यंत जाईपर्यंत शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी, तसेच विदर्भाच्या ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी ग्रामीण भागातील संसाधनांचा अधिकाधिक वापर करण्याची गरज असल्याचे गडकरी यांनी सांगितले. विदर्भातील बांबू, दूध, मध व मत्स्यविकासाला चालना दिली, तर विदर्भातील शेतकऱ्यांना लाभ होईल, असेही ते म्हणाले.

Web Title: nagpur vidarbha news loanwaiver is not possible for the farmers