प्रेमकथा नव्हे ‘टॉयलेट एक हिंस्त्रकथा’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

नागपूर - एकाच घरात राहणाऱ्या दोन कुटुंबामध्ये ‘कॉमन टॉयलेट’वरून होणाऱ्या भांडणाचे जीवघेण्या हल्ल्यात रूपांतर झाल्याप्रकरणी मंगळवारी (ता. १०) जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. सी. राऊत यांनी एकूण सात आरोपींना सात वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. आरोपींमध्ये अरुण उरकुडाजी बावणे (५४), कल्पना अरुण बावणे (४५), धीरज अरुण बावणे (२५), नितीन अरुण बावणे (२२), स्वप्निल अरुण बावणे  (१९), प्रज्योत अरुण बावणे (१९), सुवर्णा अरुण बावणे (२०) यांचा समावेश आहे.

उरकुडाजी बावणे यांनी दोन लग्न केले. त्यातून त्यांना अरुण आणि नत्थूजी ही दोन सावत्र मुले झाली. ही दोन्ही कुटुंबे एकाच घरात वेगवेगळी राहत. मात्र, दोन्ही कुटुंबीय एकाच शौचालयाचा वापर करायचे. दोन्ही कुटुंबांतील सदस्यांची संख्या पाहता शौचालयावरून दररोज आपापसात भांडणे व्हायची.

नेहमीप्रमाणे १३ सप्टेंबर २०१३ रोजी अरुण यांचा मुलगा नितीन शौचालयास जाण्यासाठी आला. त्यावेळी नत्थूजी यांनी थोड्या वेळाने येण्यास सांगितले. याचा राग आल्यामुळे त्याने ‘तुमचे घरदार संपवितो’ अशी धमकी दिली. थोड्या वेळाने भांडण शांत झाले. यानंतर रात्री ८.३० वाजतादरम्यान नत्थूजी यांचा मुलगा अजय आणि इतर कुटुंबीय घराबाहेर गप्पा करत बसलेले होते.

त्यावेळी अरुण आणि त्याच्या कुटुंबीयांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आवाज ऐकून अजय यांचा सख्खा भाऊ मिलिंद घराबाहेर आला. यामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये भांडण सुरू झाले. दरम्यान, नितीन आणि धीरज यांनी मिलिंदचे दोन्ही हात पकडून त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. 
त्याचवेळी स्वप्निलने कमरेजवळ लपविलेला चाकू बाहेर काढला आणि मिलिंदवर हल्ला केला. या सर्व प्रकारामुळे घाबरल्याने अजय यांनी आरडाओरड केली. यानंतर अरुणची पत्नी कल्पना आणि मुलगी सुवर्णा हिने दगड, विटा मारण्यास सुरुवात केली. इतक्‍यात पोलिस आले आणि सर्व आरोपींनी पळ काढला. अजय यांनी दिलेल्या तक्रारीवरून सक्करदरा पोलिसांनी गुन्हा नोंदविला. या प्रकरणी एकूण ८ साक्षीदार तपासण्यात आले. प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेत न्यायालयाने सात वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच दंडाच्या एकूण रकमेपैकी पाच हजार रुपये मिलिंदला देण्याचा आदेश देण्यात आला. या प्रकरणी सरकारतर्फे सरकारी वकील वसंत नरसापूरकर यांनी बाजू मांडली.

Web Title: nagpur vidarbha news love story toilet crime