महाराजबागेतील वाघिणीचा मुक्काम वाढला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 जुलै 2017

नागपूर - महाराजबाग प्राणिसंग्रहालयातील ‘साहेबराव’ वाघापाठोपाठ आता ‘ली’ नावाच्या वाघिणीची रवानगी गोरेवाडा रेस्क्‍यू सेंटरमध्ये करण्यासाठी यंत्रणा सज्ज होती. वाघीण पिंजऱ्यात न आल्याने तिचा महाराजबागेतील मुक्काम एका दिवसाने वाढला आहे.

नागपूर - महाराजबाग प्राणिसंग्रहालयातील ‘साहेबराव’ वाघापाठोपाठ आता ‘ली’ नावाच्या वाघिणीची रवानगी गोरेवाडा रेस्क्‍यू सेंटरमध्ये करण्यासाठी यंत्रणा सज्ज होती. वाघीण पिंजऱ्यात न आल्याने तिचा महाराजबागेतील मुक्काम एका दिवसाने वाढला आहे.

वाघिणीला गोरेवाड्यात नेण्यासाठी गोरेवाडा व महाराजबाग विभागाच्या प्रशासनाने पिंजऱ्यात बंदिस्त करण्यासाठी सलग साडेतीन तासांपेक्षा अधिक शर्तीचे प्रयत्न केले. मात्र, सायंकाळ झाल्यानंतरही यश आले नाही. प्रधान मुख्य वनसंरक्षकांच्या आदेशानुसार वाघिणीला स्थलांतरित करण्यासाठी तीन वाजता गोरेवाडा प्रशासनाचे अधिकारी आले. प्रारंभी  आणलेला पिंजरा वास्तव्यास असलेल्या प्रवेशद्वाराजवळ लावला. मात्र, नीट बसत नसल्याने त्याला बदलविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दुसरा पिंजरा लावला. मात्र, तो पिंजरा उंच होता. अखेरीस त्या पिंजऱ्याला चाकावरून काढले आणि प्रवेशद्वाराजबळ लावले. वाघीण पिंजऱ्यात येण्यास तयार नसल्याने मोहीम थांबविली.

यावेळी गोरेवाड्याचे विभागीय वनाधिकारी नंदकिशोर काळे, सहायक वनसंरक्षक श्रीनिवास माडभूषी, एस. डी. राठोड, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद धूत, मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते, महाराजबागेचे प्रभारी डॉ. सुनील बावस्कर आणि वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील सोनटक्के होते.

...तरच वाघिणीला अधिवासात सोडा 

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रातून बंदिस्त केलेली वाघीण मूळ अधिवासात सोडण्यासाठी शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे. मात्र, तिला मूळ अधिवासात सोडताना काळजी घ्यावी लागणार आहे. त्या वाघिणीवर २४ बाय ७ लक्ष ठेवणारी पूर्णपणे यंत्रणा तयार करावी. ही चमू सलग चार ते पाच महिने वाघिणींचेच सूक्ष्म संनियंत्रण करेल, असे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (पूर्व) यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांना दिलेल्या अहवालात नमूद आहे. मात्र, त्यावर निर्णय झाला नसल्याची माहिती आहे. 

या वाघिणीचे सूक्ष्म पद्धतीने संनियंत्रण करण्यासाठी तज्ज्ञ चमूचा समावेश करण्यात यावा, असे या अहवालात म्हटले आहे. वाघीण ही शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे विकसित झाली आहे. आईपासून नुकतीच विभक्त झालेली आहे. युवावस्थेत आल्यानंतर युवकांकडून जशा काही चुका होतात. तशाच पद्धतीने ती सध्या वागत असल्याने हे हल्ले झालेले आहेत. हल्लेही १५ दिवसांच्या अंतराने झालेले आहेत. त्यामुळे ती नरभक्षक आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. हे लक्षात घेता, तिला पुन्हा काळजी घेऊन अधिवासात सोडता येऊ शकते, असे तज्ज्ञांनी दिलेल्या मतानुसार सोडण्याची शिफारस केली आहे. अन्यथा या वाघिणीला गोरेवाडा येथे होणाऱ्या इंडियन सफारी अथवा चंद्रपूरजवळील सफारीमध्ये सोडण्याचा पर्यायही आपल्या समोर आहे, असेही अहवालात म्हटले आहे. अहवालात काही अटी आणि शर्तीवर वाघिणीला सोडण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. शेवटी प्रधान मुख्य वनसंरक्षकच त्यावर अंतिम निर्णय घेतील, असे मत अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक रामबाबू यांनी 
व्यक्त केले.

Web Title: nagpur vidarbha news maharajbag tiger