बाजारपेठेत शुकशुकाट

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

नागपूर - जीएसटी आणि नोटाबंदीमुळे वाढलेल्या महागाईचा फटका आता व्यापाऱ्यांना  बसू लागला आहे. दिवाळीच्या तोंडावर ग्राहकच नसल्याने किराणा, कापड, साड्याची दुकाने  ओस पडली आहेत. यामुळे व्यापारी वर्गात स्टॉक संपतो की नाही या चिंतित आहेत.  

नागपूर - जीएसटी आणि नोटाबंदीमुळे वाढलेल्या महागाईचा फटका आता व्यापाऱ्यांना  बसू लागला आहे. दिवाळीच्या तोंडावर ग्राहकच नसल्याने किराणा, कापड, साड्याची दुकाने  ओस पडली आहेत. यामुळे व्यापारी वर्गात स्टॉक संपतो की नाही या चिंतित आहेत.  

दिवाळी म्हटलं की सर्व कुटुंब एकत्र येतात. गोडधोड पदार्थ करणे हे ठरलेले. दिवाळी आठवड्यावर आहे. यामुळे बाजारपेठ गजबजलेली असायला हवी. पण, यंदा मात्र तसे दिसत नाही. वाढलेल्या महागाईच्या चटक्‍याने किराणासह कपडा, साड्या दागिन्यांच्या दुकानांवर ऐन दिवाळीत संक्रांत आली आहे. नागपुरातील बाजारपेठेत शुकशुकाट आहे. महिन्याची सुरुवात असल्याने काही प्रमाणात कुठे कुठे तुरळक गर्दी दिसत आहे. मात्र, ती महिन्याचा किराणा खरेदी करण्यासाठीच आहे. कोट्यवधींची उलाढाल या बाजारात दिवाळीच्या पर्वावर होत असते. यंदा मात्र, ती गर्दी हरवल्याचे चित्र आहे. दिवाळीच्या मोसमात हरभरा डाळीला अधिक मागणी असते. यावर्षी हरभरा डाळीच्या दरात गेल्या पंधरा दिवसांत मागणी नसल्याने प्रतिकिलो पाच रुपयांनी घट झाली. तूरडाळीच्या दरातही घसरण झाली आहे. तरीही ग्राहकांकडून मागणी होत नसल्याने ग्राहक कुठे हरविले अशी बोलकी प्रतिक्रिया किराणा व्यापारी प्रताप मोटवानी यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.  दिवाळी आल्याने बाजारात मोठी लगबग असायला हवी होती.

मात्र, ती लगबग तर सोडाच दिवाळीसाठी स्टॉक केलेला माल यंदा संपतो का नाही याची भीती व्यापाऱ्यांना वाटू लागली आहे. दुष्काळ त्यापाठोपाठ झालेली नोटाबंदी, आणि त्यानंतर बसलेला जीएसटीचा फटका. यामुळे भाववाढ तर झालीच शिवाय जीएसटीचा गवगवा एवढा झालाय की ग्राहक दुकानाची पायरी चढायला तयार नाहीत. जरी ग्राहक आला तर एखादी वस्तू जिथे एक ते दोन किलो घ्यायचा तिथं अर्धा किलो घेत असल्याचं व्यापारी सांगत आहेत.

मागच्या वर्षीच्या तुलनेत डाळींचे दर निम्म्यावर आहेत. रवा, मैदा, साखरेचे भाव स्थिर असतानादेखील बाजारपेठातील वर्दळ थांबली आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी व्यापाऱ्यांनी रविवारी दुकाने सुरू ठेवली होती. तरी हवा तसा प्रतिसाद नाही.  
- अशोक संगवी, व्यापारी

Web Title: nagpur vidarbha news market relax