माध्यमांचा भर बातम्यांऐवजी ‘गॉसिप्स’वर - मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 जून 2017

नागपूर - ऑनलाइन माध्यम व सोशल मीडिया यांचा भर बातम्यांऐवजी ‘गॉसिप्स’वर दिसून येत आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या या प्रवृत्तीमुळे पत्रकारितेची विश्‍वासार्हता कमी होत चालल्याची खंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

नागपूर - ऑनलाइन माध्यम व सोशल मीडिया यांचा भर बातम्यांऐवजी ‘गॉसिप्स’वर दिसून येत आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या या प्रवृत्तीमुळे पत्रकारितेची विश्‍वासार्हता कमी होत चालल्याची खंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र पत्रकार परिषदेतर्फे रविवारी (ता. २५) पत्रकारिता पुरस्कार सोहळा रेशीमबागेतील महर्षी व्यास सभागृहात पार पडला. या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, संघटनेचे अध्यक्ष एस. एम. देशमुख आदी होते. न्यायपालिका आणि माध्यमांवर लोकांचा विश्‍वास आहे. आजही या संस्थांकडे सामान्य नागरिक श्रद्धेने पाहतो. मात्र, काही वर्षांमध्ये पत्रकारितेची बदललेली दिशा विश्‍वासार्हतेला तडा जाण्यास कारणीभूत ठरत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. पत्रकारितेला सत्य आणि विश्‍वासाची जोड आवश्‍यक आहे. पत्रकारिता हा धर्म आणि व्यवसाय दोन्ही आहे. आर्थिकदृष्ट्या हा व्यवसाय यशस्वी करताना तत्त्वांचा विसर पडू नये, असे गडकरी म्हणाले. या वेळी ज्येष्ठ विचारवंत मा. गो. उपाख्य बाबूराव वैद्य यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. याशिवाय देण्यात आलेल्या पत्रकारिता पुरस्कारांमध्ये सुनील चावके, गजानन जानभोर, कार्तिक लोखंडे, गोपाळ साक्रीकर, विनोद जगदाळे, रश्‍मी पुराणिक, चंद्रकांत सामंत, राजन वेलकर, गो. पी. लांडगे तसेच रामटेक तालुका मराठी पत्रकार संघ आदींचा समावेश आहे. 

शंभरीची ना इच्छा ना उमेद
जीवनगौरव पुरस्काला उत्तर देताना, ‘एक वर्षापूर्वीपर्यंत शंभरी गाठण्याची इच्छा आणि उमेद होती. मात्र, आता ती काही राहिली नाही,’ असे मा. गो. वैद्य म्हणाले. मागो सध्या ९४ वर्षांचे आहेत. एरव्ही शंभरी गाठणारच असे हमखास म्हणणाऱ्या मागोंनी पहिल्यांदाच कुठल्या सार्वजनिक कार्यक्रमामध्ये ‘मृत्यू जितक्‍या लवकर येईल, तितके बरे’ असे म्हटल्यानंतर उपस्थितांपैकी अनेकांना आश्‍चर्याचा धक्का बसला.

Web Title: nagpur vidarbha news media pressure on gossip