आमचे आयुष्य अधांतरी आहे भाऊ...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

नागपूर - आम्ही सारे पॅरामेडिकलचे विद्यार्थी... कुणी रेडिओलॉजी तंत्रज्ञ तर कुणी प्रयोगशाळेतील तंत्रज्ञाचा अभ्यासक्रम शिकत आहे... बॅचलर डिग्री आहे... बीपीएमटी असे डिग्रीचे नाव... परंतु, या अभ्यासक्रमाची शासनाच्या सेवा पुस्तिकेत नोंद नाही... त्यामुळे सहा वर्षांपासून पदवी झाल्यानंतरही राज्यातील १२०० विद्यार्थी बेरोजगार म्हणून जगत आहेत... शासकीय सेवेत सामावून घेतले जात नाही. पदवी पूर्ण करूनही आमचे आयुष्य अधांतरी आहे... या भावना आहेत, मेडिकलमध्ये बीपीएमटी पदवीधर विद्यार्थ्यांच्या. 

सहा वर्षांपासून राज्यात वैद्यकीय शिक्षण विभागाशी संबंधित मेडिकल महाविद्यालयात बॅचलर ऑफ पॅरामेडिकल अभ्यासक्रमातून १२०० विद्यार्थी पास झाले. शासनाद्वारे काढण्यात आलेल्या नियमांमधून बीएसस्सी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र हे विषय वगळून बीपीएमटीला प्राधान्य देण्याचे सांगण्यात आले. परंतु तसे झाले नाही. यामुळे विद्यार्थ्यांना नोकरीपासून वंचित रहावे लागत आहे.  या विद्यार्थ्यांना मेडिकल, मेयो तसेच इतरही वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अभ्यासक्रम पूर्ण करताना त्यांना कोणत्याही प्रकारची सवलत दिली जात नाही. त्यांना राहण्यासाठी वसतिगृह नाही. या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम करताना मानधन मिळत नाही, अशा बिकट अवस्थेत हे विद्यार्थी शिकत आहेत, असे अक्षय गायधने यांनी सांगितले. आंदोलनात किरण वरघणे, ग्रोसील टेंभूर्णे, रिया वैद्य, युगुल सोनवणे, वैभव खिल्लारी यांच्यासह शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते.

१४ ऑक्‍टोबरला आंदोलन
विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता नसल्याने संबंधित बीपीएमटीच्या विद्यार्थ्यांना विद्यापीठातून मिळणाऱ्या सवलती मिळत नाही. ही मान्यता त्वरित देण्यात यावी, यासाठी १४ ऑक्‍टोबरपासून संप पुकारण्यात येणार असून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील वाड्याला घेराव घालण्यात येईल, असे पॅरामेडिकल स्टुडंट वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष अक्षय गायधने यांनी सांगितले. 

राज्य शासनाने तसेच आरोग्य विद्यापीठाने बॅचरल ऑफ पॅरामेडिकल टेक्‍नॉलॉजी या अभ्यासक्रमाला मान्यता दिली. परंतु, पदभरती करताना सेवा पुस्तकात नोंद नसल्याने या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जात नाही. आगामी काळात सेट आणि नीटनुसार प्रवेशप्रक्रिया राबविण्यात यावी. 
- अक्षय गायधने, अध्यक्ष, पॅरामेडिकल स्टुंडट वेल्फेअर असोसिएशन, महाराष्ट्र

Web Title: nagpur vidarbha news medical bpmt student issue