महाविद्यालयांत जागा रिक्त, तरीही वाढविण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

विद्यार्थी संघटनांची अजब ओरड : कला, वाणिज्य, विज्ञानसह इतर अभ्यासक्रमांचा समावेश

विद्यार्थी संघटनांची अजब ओरड : कला, वाणिज्य, विज्ञानसह इतर अभ्यासक्रमांचा समावेश

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या नामवंत महाविद्यालयांच्या जागा वाढवून देण्यासाठी शुक्रवारी (ता. १५) विद्यार्थी संघटनांनी आंदोलन केले. याशिवाय काही महाविद्यालयांमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप करीत बरेच विद्यार्थी प्रवेशापासून वंचित असल्याचे सांगण्यात येते. मात्र, विद्यापीठाच्या शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये प्रथम वर्षाच्या जागा रिक्त असल्याचे चित्र दिसून येते. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी त्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाने केले आहे.  

यंदा प्रथमच विद्यापीठाने प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी ‘कॉमन’ वेळापत्रक दिले. वेळापत्रकानुसार महाविद्यालयात प्रवेश झाले. प्रवेशासाठी महाविद्यालयांनी दिलेल्या प्रवेशाची गुणवत्ता यादी विद्यापीठाकडे सादर करण्यात आली. यात महाविद्यालयांकडे असलेल्या एकूण जागा, त्यापैकी भरलेल्या जागा आणि रिक्त जागा या माहितीचा समावेश यात करण्यात आला. शहरात विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या महाविद्यालयांची संख्या दीडशेहून अधिक आहे. या महाविद्यालयांमध्ये कला, वाणिज्य, विज्ञान आणि इतर अभ्यासक्रमांचे प्रवेश दिले जातात. मात्र, दरवर्षी शिवाजी सायन्स, डॉ. आंबेडकर, कमला नेहरू, मोहता विज्ञान महाविद्यालय, हिस्लॉप, एसएफएस, धनवटे नॅशनल, सिंधू महाविद्यालय, व्हीएमव्ही आणि एक दोन महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी गर्दी असते. त्यामुळे या महाविद्यालयात प्रवेश हाऊसफुल्ल असतात. त्यामुळे या महाविद्यालयात प्रवेश न मिळाल्यास विद्यापीठातील विज्ञान, वाणिज्य शाखेचा सर्वच जागा भरल्या असून वाढीव प्रवेशाची मागणी होते.  दरवर्षी या दबावाखाली विद्यापीठ येऊन वाढीव प्रवेशाला परवानगी देते. याउलट शहरातील काही महाविद्यालयात निम्म्यापेक्षा कमी जागा भरल्या जात असल्याचे चित्र आहे.

संकेतस्थळावर देणार माहिती 
विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या महाविद्यालयांमध्ये किती प्रवेश झाले, याची माहिती सध्या विद्यापीठाकडे आहे. ती अपडेट करून विभागातील सर्वच महाविद्यालयांत असलेल्या रिक्त जागांची माहिती विद्यापीठ संकेतस्थळावर देणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना नेमकी कोणत्या शाखेची जागा कुठे रिक्त आहे, हे कळेल.

Web Title: nagpur vidarbha news mission admission