मॉडल मिल चाळीचे छत कोसळले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑगस्ट 2017

नागपूर - सुमारे शंभर वर्षे जुन्या आणि जीर्ण झालेल्या मॉडल मिल चाळीचे छत कोसळल्याने वडील आणि मुलगी जखमी झाले. गुरू शेख (४५) व सानिया (१४) अशी जखमींची नावे आहेत. त्यांना शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

नागपूर - सुमारे शंभर वर्षे जुन्या आणि जीर्ण झालेल्या मॉडल मिल चाळीचे छत कोसळल्याने वडील आणि मुलगी जखमी झाले. गुरू शेख (४५) व सानिया (१४) अशी जखमींची नावे आहेत. त्यांना शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास छत कोसळल्‍याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जीर्ण झालेल्या इमारती पाडल्या नाही, तर मोठी हानी होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. गणेशपेठ येथील मॉडल मिलच्या चाळीला शंभरपेक्षा जास्त वर्षे झालीत. मात्र, या चाळीबाबत कोणतीही कारवाई होत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दुपारच्या सुमारास जखमी गुरू शेख व त्याची मुलगी सानिया बाहेरच्या खोलीत बसून होते. त्यांची पत्नी स्वयंपाक खोलीत होती. बाहेरच्या खोलीवरील छत अचानक बाप, लेकीच्या अंगावर कोसळले. यामुळे त्यांची पत्नी, मुले घाबरली. त्यांनी हंबरडा फोडला.

आवाज ऐकून आजूबाजूचे लोक मदतीसाठी धावून आले. लागलीच लोकांनी कोसळलेले छत आणि इतर साहित्य हटविले. समोरील शाहीन परवीन मोहम्मद फारुख शेख हिने सांगितले, छत कोसळल्याच्या आवाजाने सर्व घाबरून गेले. मुलगी आणि वडील हे दोघेही मलब्यात दबून होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी अर्धा तास लागला. यात शाहीनचे पती फारुख शेख यांच्या बोटाला जबर इजा झाली. 

सहायक आयुक्तांची भेट
धंतोली झोनचे सहायक आयुक्त गणेश राठोड व अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख सहायक आयुक्त अशोक पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. अशी घटना होता कामा नये, यासाठी जीर्ण इमारत तोडण्याची तयारी दर्शविली. मात्र, जेसीबीने तोडण्यास स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शविला. त्यामुळे दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. माजी नगरसेवक मनोज साबळे आणि राजेश खरे, राजीव डोंगर यांनी मध्यस्थी केली. त्यानंतर नागरिक जीर्ण इमारतीचा भाग तोडण्यास तयार झाले. 

लोकप्रतिनिधींनी मध्यस्थी करावी
चाळीचा प्रश्‍न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. नागरिक जीव मुठीत घेऊन जगत आहेत. पी. ॲण्ड.पी. कंपनीसोबत जागा देण्याचा करारही करण्यात आला आहे. मात्र, त्यांच्याकडून बांधकाम सुरू करण्यात आले नाही. त्यांनी काम सुरू करताच लोक जागा रिकामी करतील. तशी त्यांची तयारी आहे. कंपनीचे लोक तांत्रिक काम सांगतात. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी मध्यस्थी करून प्रश्‍न निकाला काढावा, असे राजेश खरे म्हणाले.

वाढीव मंजुरी
राष्ट्रीय टेक्‍सटाइल महामंडळाने पीपीपी तत्त्वावर ही जागा विकसित करण्याचा निर्णय घेतला होता. दहा वर्षांपूवी पी.ॲण्ड पी. कंपनीला याचे कंत्राट देण्यात आले. त्यावेळी ४१६ गाळेधारक होते. त्यांना ३०० चौरस फुटांचे घर बांधून देण्याच निश्‍चित झाले होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बांधकामाचा नकाशाही कंपनीकडून मनपाच्या नगररचना विभागाला सादर करण्यात आला. मात्र तो नामंजूर करण्यात आला. कंपनीकडून या कामासाठी वाढीव एफएसआयची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार महानगरपालिकेकडून तसा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला. शासनाकडून एफएसआय वाढून तो २.५ करण्यात आला. या वाढीव एफएसआयला मंजुरी देऊन आज चार महिन्यांचा काळ लोटल्यावरही अद्याप कंपनीकडून काम सुरू करण्यात आले नाही.

पोलिसांचा असहकार
कारवाई करताना होणारा विरोध लक्षात घेता धंतोली झोनचे सहायक आयुक्त राठोड यांनी गणेशपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक यांना सुरक्षा पुरविण्याची विनंती केली. मात्र, त्यांनी वरिष्ठांशी बोलण्याचा सल्ला देत असहकार दर्शविला. त्यानंतर त्यांनी मनपा आयुक्त अश्‍विन मुदगल यांच्या कानावर संबंधित माहिती घातली. 

मॉडल मिल कर्मचाऱ्यांसाठी ही चाळ तयार करण्यात आली होती. आता मिल बंद झाली आहे. कर्मचाऱ्यांच्या निवृत्तिवेतनातून ७५ हजार रुपये नवीन घरे बांधून देण्यासाठी कपात करण्यात आले होते. जागा देण्यासाठी कंपनीशी करारही करण्यात आला. जागा रिकामी करण्यास हरकत नाही. मात्र, कंपनीने आधी काम सुरू करावे.
- सुनील शेंडे, रहिवासी 

पी. ॲण्ड पी. कंस्ट्रक्‍शनला नोटीस बजावली
मॉडल मिल चाळ पाडून नवीन इमारतीला गाळे बांधून देण्यासाठी पी. ॲण्ड पी. कंस्ट्रक्‍शन कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे. चाळीतील सर्व रहिवाशांसोबत करारही झाला आहे. मात्र, आतापर्यंत कंपनीने काम सुरू केले नाही. त्यामुळे त्याला नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती धंतोली झोनचे सहायक आयुक्त गणेश राठोड यांनी दिली. 

Web Title: nagpur vidarbha news model mill chawl sealing colapse