कुख्यात जर्मन-जपान गॅंगवर मोक्‍का

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 जून 2017

पाच अटकेत, दोन फरार : मोक्‍का लावलेली भूखंडमाफियांची दुसरी टोळी

नागपूर - शहरातील कुख्यात जर्मन-जपानच्या सात सदस्यांवर मोक्‍का लावण्यात आला आहे. एसआयटीच्या स्थापनेनंतर भूखंडमाफिया ग्वालबंशी आणि आता जर्मन-जपान गॅंगवरही मोका लावला आहे. गुन्हेशाखेचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत विस्तृत माहिती दिली.

पाच अटकेत, दोन फरार : मोक्‍का लावलेली भूखंडमाफियांची दुसरी टोळी

नागपूर - शहरातील कुख्यात जर्मन-जपानच्या सात सदस्यांवर मोक्‍का लावण्यात आला आहे. एसआयटीच्या स्थापनेनंतर भूखंडमाफिया ग्वालबंशी आणि आता जर्मन-जपान गॅंगवरही मोका लावला आहे. गुन्हेशाखेचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत विस्तृत माहिती दिली.

रशीद खान (६५), त्याची मुले अजहर खान (३१) गॅंग प्रमुख, अमजद खान (३३), वसीम उर्फ शेरा रशीद खान (२४), राजा खान (३५), परवेज खान जर्मन खान (३४) सर्व रा. जाफरनगर, टीचर्स कॉलनी आणि जावेद अन्सारी अब्दुल वहाब अन्सारी (४८, रा. स्वागतनगर, काटोल रोड) अशी मोकाची कारवाई केलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील रशीद व परवेज वगळता अन्य आरोपी अटकेत आहेत. शाळेवर संघटितपणे अनधिकृत कब्जा केल्याप्रकरणी ही कारवाई केली.

सुमसूननिशा मोहम्मद इस्माईल पठाण यांचे पती इस्माईल पठाण यांनी प्रोग्रेसिव्ह को-ऑप. हाऊसिंग सोसायटीच्या नावाने गिट्टीखदान रोडवरील ६.५ एकर शेतजमीन खरेदी करून १९८५ मध्ये शाळा सुरू केली. २०१३ मध्ये रशीद खान व मुलांनी कब्जा करून शाळा बंद पाडली. जमीन मालकांना शाळेत येण्यास मज्जाव करीत होते.

जागा हवी असल्यास ५० लाखांची खंडणी देण्याची मागणी केली. सुमसूननिशा यांनी २० मे रोजी गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाकडे तक्रार केली. तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून चार आरोपींना अटक केली. आरोपींवर पूर्वीपासून खंडणी, धमकावणे यासारखे १३ गंभीर गुन्हे दाखल आहे. यातील ४ प्रकरणांमध्ये तपास सुरू असल्याची माहिती कदम यांनी दिली. पत्रकार परिषदेला सहायक पोलिस आयुक्त सोमनाथ वाघचौरे होते.

आरोपींवर दाखल गुन्हे
रशीद खान - ३ 
अजहर खान - ५
अमजद खान - २
वसीम उर्फ शेरा खान -४
राजा खान - १
जावेद अन्सारी -१
परवेज खान- १५

अडीच हजार पीडित आले पुढे
भूमाफियांचा ‘सातबारा’ गोळा करण्यासाठी एसआयटीचे गठन केल्यानंतर सातत्याने भूमाफिया पीडितांकडून येणाऱ्या तक्रारींचा ओघ वाढत आहे. आतापर्यंत सर्व भूमाफियांच्या विरोधात एकूण ७१० अर्ज आले असून, तक्रारकर्त्यांची संख्या अडीच हजारांच्या घरात पोहोचली आहे. यात २१० वैयक्तिक तक्रारींचा समावेश आहे. ग्वालबंशी कुटुंबीयांविरोधात २९०, तर अन्य माफियांच्या विरोधात ४०० तक्रारी आल्या आहेत.

Web Title: nagpur vidarbha news mokka on german-japan gang